कऱ्हाड (जि. सातारा) : ‘विधानसभा निवडणुकीमध्ये कऱ्हाडकर जनतेसह काँग्रेसचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, या निवडणुकीत माझा पराभव झाला. या पराभवाचे आत्मपरीक्षण करेन तसेच पराभव झाला असला तरी कऱ्हाडकरांच्या सेवेत कायम राहीन,’ अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.येथील निवासस्थानी शनिवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘कऱ्हाडकरांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे. विधानसभेतील पराभव धक्कादायक असला तरी मी कऱ्हाड शहर आणि नागरिकांच्या सेवेत कायम असणार आहे. विजयी उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना विकासकामात माझे सहकार्य राहील. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कुठेही कमी पडलो नाही. महाविकास आघाडीत एकवाक्यता होती. मात्र राज्यासह कऱ्हाड दक्षिणमध्ये पूर्णपणे अनपेक्षित निकाल लागला आहे.त्यामुळे आता आम्ही आत्मपरीक्षण करणार असून, पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न करू. लाडकी बहीण योजना यासह अन्य योजनांचा महायुतीला फायदा झाला की नाही? हे माहीत नाही. माझ्या विजयासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.ईव्हीएमबाबत बोलणे योग्य नाही!ईव्हीएम मशीनबाबत अनेकांनी यापूर्वी शंका व्यक्त केल्या आहेत. आपल्या काही सहकाऱ्यांनीही अशीच शंका व्यक्त केली आहे. मात्र, मला तसे काहीही वाटत नाही. ईव्हीएम मशीनबाबत कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे पुरावा सापडल्याशिवाय बोलणे योग्य नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
Karad South Vidhan Sabha Election Result 2024: पराभव धक्कादायक; आत्मपरीक्षण करणार - पृथ्वीराज चव्हाण, ईव्हीएमबाबत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 3:35 PM