दहिवडी : ‘दुष्काळ’ हा शब्द पुसण्यासाठी गेली ४५ दिवस तालुक्याने ऊन, वारा अन् पावसाची तमा न बाळगता दिवसरात्र काम केले. पहाटे पाचला भोंगा.. लोकं अंघोळ चहा, नाष्टा.. घर, आंगण, जनावराचा गोठा साफ.. जनावरांच्या धारा व्हायच्या तोपर्यंत सातचा भोंगा व्हायचा. ज्या ठिकाणी काम असायचं तेथे पोहोचायची. लहान मुलांपासून आबालवृद्धापर्यंत सायकल, मोटारसायकल, ट्रॅक्टर बैलगाडीसह मिळेल त्या वाहनांनी, वेळप्रसंगी चालत जायची. अख्खं गाव कामावर तुटून पडायचं. आपली जिंदगी गेली मुलांचा तरी सरळ व्हावं म्हणून काळ्या मातीला हिरवा शालू नेसवण्यासाठी झटली. काहीकाळ या माण तालुक्यात खरोखरच तुफान आलं होतं.
आता ४५ दिवसांची स्पर्धा संपली शेवटच्या दिवशी लोक नाचले. गोड जेवणही केलं. लोकांच्या डोळ्यांत आसू आणि हसू पाहायला मिळाले, या कामामुळे अनेक दिवसांचं वैर संपलं होतं. जलसंधारणाबरोबर मनसंधारण झालं होतं.
स्पर्धा संपल्यानंतर दुसरा दिवस उजडला. नेहमीप्रमाणं वाजणारा भोंगा थांबला होता. रोजची धावपळ थांबली होती. रोजची लागलेली कामाची सवय त्यामुळे मन सुनं सुनं झालं. काम करण्याची मिळालेली ऊर्जा थांबू देत नव्हती. पावले शेताकडे वळत होती; पण काय करणार रोज चालणारी पावलं थबकली होती. कारण स्पर्धा संपली होती. लोकांचं वेळापत्रकच जणू कोलमडलं होतं.
एक लढाई जिंकली होती. माणदेशी माणसांनी केलेले काम पाणी फाउंडेशनचे सीओ सत्यजित भटकळ यांनी पाहिल्यासून ते शेवटच्या दिवसापर्यंत माणच्या मातीत थांबून होते. लोकांचा उत्साह सर्व पक्षांच्या लोकांनी दिलेली मदत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मायभूमीला दिलेले योगदान यासह प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतारसह सर्व पाणी फाउंडेशनच्या टीमनं केलेल्या कामाचे विशेष कौतुक केले. वॉटरकप स्पर्धेत भाग घेतला; पण ज्या गावाला मशिनरीच नव्हती, अशा गावाला भारतीय जैन संघटनेने २७ मे पर्यंत मशीन देण्याचा निर्णय घेतला असून, हे काम स्पर्धेत धरले जाणार नसून जी गावे स्पर्धेत उतरली नाहीत त्यांना आणखी संधी उपलब्ध करून दिल्याचे तालुकाध्यक्ष भरतेशशेठ गांधी यांनी सांगितले.\
कोट्यवधीचा खर्च वाचणार..माण तालुक्यात जलसंधारण चळवळ दोन-चार वर्षांपासून सुरू होती. १०६ महसुली गावांपैकी ९० गावे आणि ४०० वाड्या-वस्त्याला टँकर लागायचे. गेल्या वर्षापासून मोठी कामे झाल्याने मे महिना आला तरी बोटावर मोजता येतील एवढ्याच गावाला टँकर लागले. वॉटरकपला मिळालेले यश पाहता प्रशासनाचा कोट्यवधींचा खर्च वाचणार आहे.-सुरेखा माने, तहसीलदार माण
माण तालुक्यातील सर्व गावे टँकरमुक्त जोपर्यंत होत नाहीत. तोपर्यंत आम्ही दुष्काळाशी लढा देऊ. आज वॉटरकपच्या माध्यमातून माणमध्ये क्रांती झाली. लोकांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेवून काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्यासाठी दिवसाची रात्र केली खरंच मी नममस्तक होतो.- अजित पवार, समन्वयक पाणी फाउंडेशन