फलटण : पंतप्रधानांची महत्त्वकांक्षी योजना असलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा उपक्रम राबविण्यासाठी सर्वत्र स्पर्धा लागली असताना सर्व शासकीय कार्यालय एकत्र असलेल्या येथील अधिकारगृहात मात्र स्वच्छतेचा बोजवारा उडून सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. शासकीय अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे वावडे आहे का? असा प्रश्न संतप्त जनतेतून व्यक्त होत असून, स्वच्छ भारत मोहिमेला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याची चर्चा होत आहे.येथील अधिकारगृहाची इमारत प्राचीन व वास्तूकलेचा अद्भुत नमुना असणारी देखणी इमारत आहे. या इमारतीमध्ये प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद कृषी विभाग, दुय्यम निबंधक, नीरा उजवा कालवा विभाग आदी शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयाच्या परिसरात दररोज हजारो नागरिक कामानिमित्त ये-जा सुरू असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या नागरिकांसाठी एकच; पण तेही तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे स्वच्छतागृह असून, या स्वच्छतागृहाभोवती प्रचंड घाण आहे. या स्वच्छतागृहातील घाणही बाहेर असून, तेथील घाणच काढली जात नसल्याने तेथे प्रचंड घाण व दुर्गंधी असल्याने आत पाऊलच ठेवता येत नाही. त्यामुळे नैसर्गीक विधीही बाहेरच लोक करीत असल्याने येथे सतत कुबट व दुर्गंधीचा वास सुटत असतो. (प्रतिनिधी)गाजर गवत माजलेअधिकारगृहाच्या परिसरात गाजर गवताचा वेढा पडलेला असून, तेथे डासांची व किड्यांची मोठी उत्पत्ती होत आहे. प्रांत कार्यालयाच्या पाठीमागे व शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा व घाण आहे. व तेथील चेंबरही उघडी असल्याने येथे घाण वास सुटत असतो. या घाणीचा व दुर्गंधीचा तसेच अस्वच्छतेचा मोठा त्रास कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांना होत असून, घाणीच्या आवतीभोवतीच त्यांना वावरावे लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे वावडेदेशात स्वच्छता मोहीम सर्वत्र राबविले जात असून, पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत आहे. दररोज साफसफाई मोहिमेचे फोटो विविध वृत्तपत्रात झळकत आहे. अधिकारीवर्गही स्वत:हून या मोहिमेत उतरत आहेत. मात्र, फलटणमधील अधिकारीगृहात विविध विभागांत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र, स्वच्छतेचे वावडे यानिमित्ताने दिसून येत आहे.
‘स्वच्छ भारत’ मोहिमेला केराची टोपली
By admin | Published: November 20, 2014 9:51 PM