संतोष गुरव -कऱ्हाड शहरातील वाढीव हद्दीसह अंतर्गत भागातून दररोज सुमारे ४० टन कचरा पालिकेकडून एकत्रित केला जात आहे. गणेशोत्सवात शहरातून अकरा दिवसांत फक्त अठरा टन निर्माल्य गोळा झाले. दिवसाला गोळा होणारा २० टन ओला कचरा आणि २० टन सुका कचरा अशा साधारणत: ४० टन कचऱ्यांवर पालिकेने प्रक्रिया करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पूर्वीच्या घनकचरा प्रकल्पाचीही अवस्था सध्या बिकट असल्याने आता दररोज शहरातून गोळा केला जाणारा ४० टन कचरा व गणेशोत्सवात गोळा झालेले १८ टन निर्माल्य अशा एकूण ५८ टन कचऱ्याची विल्हेवाट पालिका कशी लावणार, असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे.घनकचरा एकत्रिकरणासाठी पालिकेला दिवसाकाठी १३ हजार ६९८ रूपये इतका खर्च करावा लागत असल्याने पालिकेने २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद केली आहे. शहरातील नागरिक, दुकानदार तसेच भाजीविक्रेते यांच्याकडून दररोज होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून आरोग्य विभागातील स्वच्छता टीमच्या माध्यमातून शहरातील कचरा दररोज एकत्रित केला जातो. एकत्रित केला गेलेला कचरा शहराबाहेरील हद्दवाढ झालेल्या ‘बाराडबरी’ या ठिकाणी साठवला जात आहे. कऱ्हाड पालिकेने दुर्गंधीयुक्त ओला कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेट्रिक टन क्षमतेच्या बायोगॅस / वीजनिर्मिती भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबई (बीएआरसी) यांच्या प्रकल्प उभारणीस मंजुरी मिळालेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) या योजनेतून घेतला जाणार असून या प्रकल्पाची किंमत १ कोटी ६ लाख इतकी आहे. कारण या ठिकाणी पालिकेकडून दररोज ४० टन घनकचरा टाकला जात असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शहरातून दररोज ४० टनाच्या आसपास घनकचरा हा ‘बाराडबरी’ या ठिकाणी पालिकेकडून टाकला जात आहे. परिणामी महिन्याकाठी मोठ्या प्रमाणात घनकचरा या ठिकाणी साठवला जात आहे.शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेकडून दरवर्षी ठरावीक रक्कम खर्च केली जाते. यामध्ये दरवर्षी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही केली जाते. या २०१५-१६ वर्षीच्या अर्थसंकल्पात ५० लाख रूपयांची तरतूद पालिकेने केली आहे २०१४-१५ वर्षीच्या अर्थसंकल्पात ३० लाख रूपयांची तरतूद के ली होती.शहरातून दररोज ४० टन ओला व सुका कचरा गोळा केला जातो. शहरासह वाढीव हद्दीतून गोळा केला जाणाऱ्या घन कचऱ्यास तेवढा खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. घनकचरा गोळा करण्यासाठी पालिकेकडून दिवसाकाठी १३ हजार रूपये तर वर्षाकाठी ५० लाख रूपये इतका खर्च पालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी केला जातो. एवढ्या मोठ्या कचऱ्याचे होणार तरी काय, असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. हा प्रकल्प परिसरासाठी डोकेदुखी ठरला आहे. पार्ले-बनवडीकरांचा विरोधपालिकेकडून शहराबाहेर घनकचरा बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानुसार पार्ले-बनवडी या गावच्या हद्दीत एकूण १४ एकर जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, या प्रकल्पास पार्ले-बनवडी येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्याने पालिकेला प्रकल्प उभारता आला नाही. तो बाराडबरी या ठिकाणी उभारण्यात यावा, असा निर्णय पालिकेने घेतला.पालिकेची स्वच्छता टीमपालिकेच्या आरोग्य विभागाकडून १ कॉम्पॅक्टर, २ डंपरप्लेसर, ३ टॅक्टर, १६ घंटागाड्या, १ रोड स्वीपर, ४८ कचरा कुंड्यांतून २१५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कचरा एकत्रित केला जातो.
कऱ्हाड पालिकेच्या घनप्रकल्पाचा ‘कचरा’!
By admin | Published: September 29, 2015 9:56 PM