तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअखेर १२ ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा फडकविला. तर पाच ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या. मात्र, ८७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान होत आहे.
काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यात मनोमिलन झाले आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच गावात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे पहायला मिळत नाही. स्थानिक कार्यकर्त्यांनी सोयीच्या आघाड्या केल्याचे दिसते.
कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांच्या विरोधात प्रामुख्याने उदयसिंह पाटील समर्थक रिंगणात दिसतात. तर पृथ्वीराज चव्हाण समर्थक काही गावात भोसलेंसोबत तर काही ठिकाणी उंडाळकरांच्यासोबत दिसतात. उत्तर विधानसभा मतदार संघातील गावात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा बऱ्याच प्रमाणात वरचष्मा दिसत आहे. अनेक गावात राष्ट्रवादी विरूद्ध काँग्रेस असा सामना पहायला मिळतोय. काही गावात मंत्री पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात सर्व विरोधक एकवटल्याचे चित्र आहे.
इंदोली, उंब्रज, ओंड, कालवडे, पाल, काले आदी मोठ्या गावातील निवडणुका जोरदार होताना दिसतात. सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांबरोबर वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आता मात्र कोण बाजी मारणार, हे १८ जानेवारी नंतरच कळणार हे नक्की.
- चौकट
... या ग्रामपंचायतींनी फडकावला बिनविरोधचा झेंडा
तालुक्यातील उंडाळे, कामथी, किरपे, गोटे, टाळगाव, भुरभुशी, म्हारुगडेवाडी, येणके, वसंतगड, विरवडे, संजयनगर, हणबरवाडी या १२ ग्रामपंचायतींनी एकीचे बळ दाखविले. निवडणुकीत वैर निर्माण न करता येथील ग्रामस्थांनी बिनविरोधचा डंका वाजविला.
- चौकट
अपुरे पडले प्रयत्न
अंबवडे, खोडजाईवाडी, पाचुंद, लटकेवाडी, वाघेश्वर येथील ग्रामस्थांनीही बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले. त्यामुळे या ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्या.
.......................................