कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेच्या वतीने शहरातील थकबाकीदांराकडून कर वसुलीबाबत अतिशय तीव्र स्वरूपात मोहीम राबवली जात आहे. पालिकेच्या करवसुली विभागाकडून शहरातील थकबाकीदारांच्या मागे थकित कर भरण्यासाठी धडाका लावला आहे. रविवार सुटीचा दिवस असून, देखील पालिकेच्या वसुली विभागाकडून वीस लाख रुपये रक्कम वसूल करण्यात आली. पालिकेने पहिल्यांदाच शासकीय कार्यालयांवरतीही कारवाई केली आहे. पालिकेला आतापर्यंत नऊ कोेटी वसुली मधून प्राप्त झाले आहेत. मार्च महिना संपायला आता अवघा एकच दिवस उरला आहे. मात्र थकबाकीदारांना पैसे भरण्याच्या नोटिसा देऊनही त्यांच्याकडून पैसे भरले जात नसल्याने वसुली विभागाकडून कडक कारवाई करत नळकनेक्शन तोडली जात आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे थकित असणारी रक्कम थकबाकीदारांकडून जमा करण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी (२५ लाख) तसेच रविवारी (२० लाख) रुपयांची वसुली करण्यात आली आहे. रविवारी केलेल्या कारवाईमध्ये पंचायत समिती व रेव्हिन्यू क्लब या शासकीय कार्यालयासह काही थकबाकीदारांची नळकनेक्शन तोडण्यात आली. थकबाकीदारांकडून कर रक्कम जमा न केल्यास थकबाकीदारांचे दुकानाचे गाळे सील करण्यात येत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या वसुली मोहिमेस व्यावसायिक तसेच घरगुती लोकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. आतापर्यंंत पालिकेकडून कार्वे नाका, मुजावर कॉलनी, शनिवार पेठ आदी ठिकाणी असलेल्या घरगुती व व्यावसायिक कर थकितदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेकडून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नळकनेक्शन तोडण्याची कारवाई केली आहे. पालिकेकडून रविवारी देखील कर रक्कम गोळा करण्यात आली. त्यामध्ये वीस लाख रुपये रक्कम प्राप्त झाली. (प्रतिनिधी)रक्कम नाही तर पाणीही नाही वर्षानुवर्षे घरपट्टी व पाणीपट्टीची थकित असणारी रक्कम जमा करण्याचे पालिकेकडून लोकांना सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेकडून वारंवार त्यांना नोटिसाही देण्यात आल्या तरी सुध्दा त्यांच्याकडून रक्कम भरली जात नसल्याने अखेर पालिकेकडून नळकनेक्शन तोडत अगोदर रक्कम भरा मग; पाणी मिळेल अशा सूचना थकबाकीदारांना करण्यात येत आहेत.प्रथमच शासकीय कार्यालयांवर कारवाई पालिकेने केलेल्या धडक कारवाईतून शासकीय कार्यालयेही वाचली नाहीत. तसेच वर्षानुवर्षे थकित ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. पंचायत समिती (८ लाख रुपये ) आणि रेव्हिन्यू क्लब ( ३ लाख ८२ हजार रूपये ) अशी रक्कम शासकीय कार्यालयांकडून पालिकेस येणे असल्याने ती वर्षानुवर्षे त्यांच्याकडून भरली गेली नाही. त्यामुळे या शासकीय कार्यालयांची नळकनेक्शन तोडण्यात आली असल्याची माहिती कर वसुली प्रमुख अशोक पाडळे यांनी दिली.
कऱ्हाड पालिकेचा कर वसुलीचा धडाका
By admin | Published: March 29, 2015 11:09 PM