VidhanSabha Election 2024: आघाडीची ‘तुतारी’च; युतीकडून कऱ्हाड ‘उत्तर’ कुणाला?; बाळासाहेब पाटील षटकाराच्या तयारीत
By संजय पाटील | Published: October 18, 2024 12:27 PM2024-10-18T12:27:37+5:302024-10-18T12:29:11+5:30
काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेत: विरोधात तिघांकडून ‘फिल्डिंग’
संजय पाटील
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तरेत विजयी ‘पंच’ मारणारे बाळासाहेब पाटील षटकाराच्या तयारीत आहेत. मात्र, ‘तुतारी’ला कमळ भिडणार की घड्याळ, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. गतवेळी शिवसेनेने तर त्यापूर्वी भाजपने उमेदवार दिलेल्या या मतदारसंघावर यंदा अजित पवार गटासह शिंदेसेनेचा दावा असून, उमेदवार निश्चितीनंतरच येथील चित्र स्पष्ट होणार आहे.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघ हा आमदार बाळासाहेब पाटील यांचा गड मानला जातो. मात्र, २०१४ पासून भाजपनेही येथे चांगलीच साखरपेरणी केली आहे. २०१४च्या निवडणुकीत येथे बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे अशी तिरंगी लढत झाली.
त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत धैर्यशील कदम यांनी धनुष्यबाण उचलला. मनोज घोरपडे यांनीही अपक्ष रिंगणात उडी घेतली. त्यामुळे दुसऱ्यांदा येथे तिरंगी लढत झाली. यंदाच्या निवडणुकीत येथील राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘तुतारी’च्या विरोधात घड्याळ, धनुष्यबाण की कमळ असणार, हे चित्र उमेदवार निश्चितीनंतरच स्पष्ट होईल.
२०१९ची पुनरावृत्ती होणार का?
- पक्षफुटीनंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी ‘तुतारी’ वाजवणे पसंत केले आहे. मात्र, भाजपच्या चिन्हावरून लढण्यासाठी मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ इच्छुक आहेत.
- ही जागा भाजपला सोडली जाणार की, २०१९च्या फॉर्म्युल्यानुसार भाजपमधून आयात केलेला उमेदवार घड्याळ हाती घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काँग्रेस ‘किंगमेकर’च्या भूमिकेत
कऱ्हाड उत्तर मतदारसंघामध्ये काँग्रेसची भूमिका ‘किंगमेकर’ ठरणारी आहे. गत निवडणुकांचा विचार करता काँग्रेसने आघाडी धर्म येथे पाळला होता. मात्र, मध्यंतरी मतभेद झाले आहेत. त्यामुळे उत्तरेत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
कऱ्हाड उत्तर विधानसभा २०१९ची निवडणूक
- बाळासाहेब पाटील : १,००,५०९
- मनोज घोरपडे : ५१,२९४
- धैर्यशील कदम : ३९,७९१
मतदार
- पुरुष : १,५४,६२८
- महिला : १,४९,८३१
- तृतीयपंथी : ७
- एकूण : ३,०४,४६६