प्रमोद सुकरे -- कऱ्हाड --गेल्या आठवड्यात कऱ्हाडात उंडाळकर, रेठरेकरांच्या मैत्रीपर्वाचा एक मेळावा झाला. निमित्त होतं. मैत्रिपर्वाने जिंकलेल्या निवडणुकीतील विजयी कारभाऱ्यांच्या सत्काराचं! पण या सत्कार समारंभात विलासराव पाटील-उंडाळकर व डॉ. सुरेश भोसले रेठरेकर यांनी आगामी पालिका निवडणुकीत हे मैत्रिपर्व तसेच कायम राहील, अशी ‘गुगली’ टाकल्याने कऱ्हाडातील प्रस्थापित पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता मात्र पसरली आहे. कऱ्हाड नगरपरिषद गेल्या विधानसभा निवडणुकीपासून दक्षिण विधानसभा मतदार संघात समाविष्ट झाली आहे. यापूर्वी पालिका उत्तर विधानसभा मतदार संघात होती. त्यामुळे उंडाळकर पाटलांचा शहराशी तसा संबंध आला नाही. अन् दक्षिणेतील पाटलांचा अन् उत्तरेतील पाटलांचा तसा अलिखित करारच होता की एकमेकांच्या कार्यक्षेत्रात कुणी हस्तक्षेप करायचा नाही. पण गेल्या विधानसभेला कऱ्हाड शहर दक्षिणेत आले अन् उंडाळकरांच्या पदरात सगळ्यात कमी मतरूपी ‘दक्षिणा’ मिळाली. त्यामुळे भविष्यातील राजकारणासाठी त्यांना शहरात हातपाय पसरणे गरजेचेच आहे. अन् त्यांना तेवढेच साध्य करायचे आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मैत्रिपर्वातले दुसरे शिलेदार असणाऱ्या रेठरेकरांनी यापूर्वी सन २००६ मध्ये छुप्या पद्धतीने पालिकेच्या निवडणुकीत ‘एन्ट्री’ केली. अनेक अपक्षांना रसद पुरवून गनिमी कावा केला. निकालानंतर निवडून आलेल्या तीन अपक्षांनी भोसलेंचे आशीर्वाद घेण्यासाठी कृष्णा ट्रस्ट गाठले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी अस्तित्वात आली. या तीन अपक्षांच्या हाती सत्तेच्या चाव्या गेल्या अन् पुढचं राजकारण सर्वांना माहीतच आहे. त्यानंतरही भोसले कंपनी कऱ्हाडच्या राजकारणात हस्ते परहस्ते सक्रिय राहिली. मात्र, भाजपचं कमळ हातात घेतलेल्या डॉक्टरांना विधानसभेला प्रथम क्रमांकाची मते शहराने दिली नाहीत. कऱ्हाड शहराच्या राजकारणात आजवर दिवंगत पी. डी. पाटील गटाचाच प्रभाव अधिक राहिल्याचे पाहायला मिळते. त्याला जनशक्ती आघाडी, नगरविकास आघाडी आदींच्या माध्यमातून दिवंगत जयवंतराव जाधव, माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, अरुण जाधव, दिवंगत द. शि. एरम, सुभाषराव जोशी आदींनी त्या-त्या काळात छेद देण्याचा प्रयत्न केला; पण अपवाद वगळता यांना तितकेसे यश मिळाल्याचे दिसत नाही. सध्याच्या शहराच्या राजकारणात हे पारंपरिक स्पर्धक निवडणुकीची चाचपणी करीत आहेत. मूळच्या कोणकोणत्या आघाड्यात बिघाड्या होणार? नव्या आघाड्या कशा होणार? कोण कोणाकडे जाणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असतानाच उलट सुलट चर्चा सुरू असतानाच, मैत्रिपर्वाच्या नेत्यांनी टाकलेल्या गुगलीने पुढाऱ्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.मतदार बाहेरच्या नेत्यांना स्वीकारणार का?कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत नेमक्या कशा प्रकारे आघाड्या होणार हे अद्याप अस्पष्ट आहे. पण या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख चाचपणी करीत आहेत. त्यामुळे शहरातील नेहमीचीच नेतृत्व सोडून मतदार बाहेरच्या या नेत्यांना स्वीकारणार का, हे पाहावे लागेल. उदयदादाही म्हणतायत,‘वेट अॅण्ड वॉच’माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले यांनी कऱ्हाड पालिकेत मैत्रिपर्व असेच राहणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील यांना छेडले असता. नेत्यांनी घेतलेला निर्णय राबविणे एवढेच आपले काम करणे, असे सांगत पालिका निवडणुका घडामोडीबाबत जरा थांबा व पाहा चित्र स्पष्ट होईलच, अशी प्रतिक्रिया दिली.
कऱ्हाड पालिकेतही म्हणे मैत्रिपर्वाचा ‘फॉर्म्युला’!
By admin | Published: July 25, 2016 10:34 PM