कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील करांडेवाडीच्या युवकाने एक जगावेगळं स्वप्न पाहिलंय. स्वप्न नव्हे तर त्याने अगदी चंगच बांधलाय. मुंबईहून दुचाकीवरून तो थेट लंडनला जाणार आहे. त्यातच हजारो किलोमीटरचा हा प्रवास तो एकटा करणार आहे, हे विशेष. या प्रवासासाठी त्याने जय्यत तयारीही सुरू केली आहे. महाराष्ट्र दिनी या स्वप्नाचा पाठलाग करत तो मुंबईतून सीमोल्लंघन करणार आहे.
करांडेवाडीतील योगेश आलेकरी हा सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा; पण सामान्य कुटुंबात जन्म घेऊनही आजपर्यंत जे कोणाला शक्य झाले नाही ते करण्याचे धाडस दाखवत तो असामान्य कर्तृत्व करण्यासाठी सज्ज झालाय. योगेशने कऱ्हाडच्या प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर व्यवसायासाठी तो मुंबईला गेला. गावी करांडेवाडीत त्याचे आई-वडील शेतात राबतात. आई, वडिलांच्या या कष्टाची जाण ठेवत योगेशही गावाकडील शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो. व्यवसाय आणि शेती सांभाळतानाच त्याने आपला दुचाकी प्रवासाचा छंदही तितक्याच आवडीने जोपासलाय.
योगेशने दुचाकीवरून आजपर्यंत संपूर्ण देश पालथा घातला आणि आता ‘दुचाकी राईड’चा नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तो मुंबईहून थेट लंडनच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कागदोपत्री पूर्तता तो करतोय. महाराष्ट्र दिनी त्याच्या या मोहिमेला प्रारंभ होणार आहे.
योगेशने केलेला दुचाकी प्रवास१) उत्तरेला उत्तुंग हिमालयाच्या पर्वतरांगा२) लडाखची ‘ड्रीम राईड’ अनेकदा पूर्ण३) पश्चिमेला थार व कच्छचे वाळवंट पार४) ईशान्येकडील घनदाट जंगलातही प्रवास५) आसाम, अरुणाचल, मेघालय, नागालँडमध्येही ‘राईड’योगेशच्या लंडनच्या ‘बाईक राईड’मध्ये...
- २४ देश
- ३ खंड
- १०० दिवस
- २५ हजार किलोमीटर प्रवास
...असा असेल नियोजित प्रवास
योगेश मुंबईतून निघाल्यानंतर नेपाळ, दुबई, इराण, तुर्की आणि मग पुढे युरोपियन देशांमध्ये प्रवास करून इंग्लंडमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर पुन्हा दक्षिणेकडे प्रयाण करत आफ्रिकेतील मोरोक्को या देशात तो काही दिवस प्रवास करून पुन्हा पोतुर्गाल, स्पेनमार्गे परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
मी आजपर्यंत नेपाळ, भूतानमध्ये ‘बाईक राईड’चा अनुभव घेतला आहे. तसेच दक्षिण आशियातील कंबोडिया आणि व्हिएतनाम या देशांतही दुचाकीवरून भ्रमंती केली आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूने ड्रायव्हिंग असणाऱ्या या देशांमध्ये मित्रांसोबत आम्ही धम्माल केली आहे. आता मी एकटाच मुंबईहून दुचाकीवरून लंडनला जाणार आहे.योगेश आलेकरी