कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सध्याच्या व संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथील यशवंतराव चव्हाण बचत भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली. तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांना यावर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता या बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच टंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके, सभापती शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदय पाटील, मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांची उपस्थिती होती.आमदार चव्हाण म्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. सध्या सतरा गावांमध्ये अतितीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी येणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत ग्रामसेवक, तलाठी व अधिकाऱ्यांनी दक्षता पाळावी व गावांचा आराखडा तयार करून उपाययोजना करण्यास सुरुवात करावी.सध्या साडेतीन महिने पाणीटंचाईची परिस्थिती भासेल, असे चित्र दिसून येत आहे. दि. १३ जुलै २००५ रोजी पाणीपुरवठा विभागास एक आदेश प्राप्त झाला. यामध्ये संबंधित काळातील मंजूर व सुरू असलेल्या योजनांच्या कामांना पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात यावी, असे सांगण्यात आले. याबाबत नागपूर येथे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र, त्यावेळी ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे जोपर्यंत योजनांच्या कामांच्या स्थगितीचा आदेश उठत नाही, तोपर्यंत योजनांची कामे बंदच राहणार आहेत. सध्या दि. ३१ मार्चपर्यंत जल सर्वेक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांचे ग्रामसेवक, तलाठी व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ सर्वेक्षण करावे. जेणेकरून टंचाईचा आराखड्यात गावांचा समावेश केला जाईल व संबंधित गावांमध्ये कामे तत्काळ सुरू केली जातील आणि ज्या गावांतील ग्रामपंचायतींकडून पाण्याचे एटीएम मशीन बसविण्यासाठी मागणी होईल त्या गावांना शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन देण्यात यावेत.’यावेळी प्रांताधिकारी किशोर पवार म्हणाले, ‘ज्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कऱ्हाड तालुक्याचा २०१७-१८ वर्षाचा पाणीटंचाईचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्या आराखड्यामध्ये अद्यापपर्यंत शासनाने समाविष्ट केलेली गावे सोडली तर इतर गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या ज्या गावांचा समावेश करावयाचा बाकी राहिला आहे. तसेच ज्या गावांत तीव्र पाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा गावांचा दोन दिवसांत सर्व्हे करून त्या गावांचे ठराव व प्रस्ताव तत्काळ प्रशासनास ग्रामसेवक व तलाठी, मंडलअधिकाऱ्यांनी सादर करावे.’कऱ्हाड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी कऱ्हाड तालुक्याचा आढावा सादर केला. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनांच्या माध्यमातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कामांची माहिती दिली. तसेच तालुक्यात २२२ गावे असून, १९८ ग्रामपंचायती आहेत. तर तालुक्याची ग्रामीणची लोकसंख्या ही ५ लाख ८४ हजार ८५ इतकी आहे. तालुक्यात सरासरी पर्जन्यमान हे ६३० मिलीमीटर आहे. तालुक्यात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना या चार तर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना २७२ आहेत. लघु नळ पाणीपुरवठा योजना या १५० आहेत. हातपंपांच्या संख्या ही १ हजार २४६ इतकी असल्याची माहिती उपअभियंता आरळेकर यांनी दिली.आढावा बैठकीदरम्यान गोसावेवाडी, घोलपवाडी व कोरिवळे या तीन गावांमध्ये भीषण पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येथील ग्रामस्थांच्या पाणीटंचाईचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली. यावेळी विहिर खोलीकरण व रूंदीकरण कामाचे टंचाई आराखड्यातून नाव निगडी गावचे नाव वगळण्यात आले असल्याची माहिती दिली. शासनादरबारी नुसती कागदोपत्रीच कामे होत असून प्रत्यक्षात मात्र केली जात नसल्याचे सांगितले. यावेळी पाणी पुरवठाचे उपअभियंता महेश आरळेकर यांनी नवीन वर्षात नवीन प्रस्ताव सादर करण्याची मागणी सरपंचांना दिली. यावेळी सुपने येथील दूषित पाणी पुरवठ्याबाबत सदस्या सुरेखा पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. गावाबाहेरील नदीतून विहिरीत पाणी सोडले जात असून त्या विहिरीतून शुद्धीकरण न करता तसेच पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांना सोडले जात आहे. पिण्याअयोग्य पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गावास शुद्ध पाण्याची एटीएम मशीन देण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी कालेटेक, जुजारवाडी, चचेगाव, नांदगाव, पवारवाडी, मनव, बामणवाडी, आेंड, घारेवाडी, अंतवउी, रिसवड, गोसावेवाडी, किवळ, सयापूर, करंजोशी अशा तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांतील पाणी प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व पाणी पुरवठा योजनेतील अधिकारी, ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)या गावांनाही बसतील झळा..कऱ्हाड तालुक्यातील पेरले, महारुगडेवाडी, टाळगाव, अंतवडी, कुसूर, खोडशी, शिंदेवाडी, घारेवाडी, कोरेगाव, धावरवाडी, खालकरवाडी, कोळे, रिसवड, नांदगाव, पोतले, काले, उत्तर कोपर्डे, शिंगणवाडी, शेरे, पवारवाडी, नांदलापूर, कवठे, आरेवाडी, बेलदरे, दुशेरे, अंधारवाडी, खुबी, म्हासोली, जुळेवाडी, कालेटेक, ओंडोशी, गोंदी, सयापूर, चचेगाव, भवानवाडी, ओंड, वानरवाडी, बामणवाडी, हरपळवाडी, करंजोशी, वराडे, गायकवाडवाडी, पाडळी-हेळगाव, बानुगडेवाडी, मनू व गोसावेवाडी या गावांना येत्या काही दिवसांत टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी गाव टंचाईग्रस्त घोषित करण्यासाठी ठराव सादर केले आहेत.तीन गावांना टँकरने पाणीगोसावेवाडी, घोलपवाडी व कोरिवळे या तीन गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच गमेवाडी येथील विहिरीचे खोलीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित बैठकीत देण्यात आली.
कऱ्हाडला पन्नास गावांना टंचाईच्या झळा !
By admin | Published: March 20, 2017 11:40 PM