इसवी सन पूर्व तिसरे ते इसवी सन आठशे या शतकांच्या काळात कऱ्हाड हे नगर राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्धीच्या शिखरावर होते. तसेच पश्चिम महाराष्ट्राची राजधानीही होते, असे संदर्भ आढळतात. या गावाच्या नावाबाबतही अनेक मतमतांतरे आहेत. भरूत व कुड्याच्या लेण्यांतील शिलालेख इ.स. पूर्व ३०० ते इ. स. २०० च्या दरम्यानचे आहेत. भरूतच्या शिलालेखात ‘करहटक’ आणि कुड्याच्या लेण्यात ‘करहाकडक’ असे या शहराचे नाव लिहिले आहे.
महाभारताचा काळ इ. स. पूर्व २००० मानतात. महाभारताच्या सभापर्वाच्या ३२ व्या अध्यायात ७२ व्या श्लोकात ‘करहटक’ असे या शहराचे नाव आहे. श्रवणबेळगोळ येथील स्तंभावर ‘करहटक’ असाच उल्लेख आहे. ‘करहटक महात्म्य’ हा दहाव्या शतकातील ग्रंथ आहे. या सर्वांच्या आधारे इतिहास संशोधक य. रा. गुप्ते यांनी म्हटले आहे की, पाटणजवळ कोयना नदीस मिळणाऱ्या नदीचे नाव ‘केरा’ असे आहे. त्यामुळे पूर्वी कोयना नदीचे नाव ‘कऱ्हा’ असावे आणि या कऱ्हा नदीच्या काठचे हाटक म्हणजे सोन्यासारखे किंवा बाजाराचे गाव म्हणून करहटक असे नाव पडले असावे.
स्कंद पुराणांतर्गत ‘श्रीकृष्णमहात्म्य’ या दहाव्या शतकातील ग्रंथात श्रीकर नावाच्या शंकरभक्ताची कथा आहे. श्रीकराने शंकराला प्रसन्न करून घेतले तेव्हा ‘तुझ्या व माझ्या नावाने या क्षेत्राला लोक ओळखतील’ असा श्रीकरास वर दिला. त्याप्रमाणे हे क्षेत्र ‘श्रीकरहाटकेश’ नावाने ओळखले जाऊ लागले, अशीही अख्यायिका आहे. पुढे काळाच्या ओघात सुरूवातीची, शेवटची अक्षरे लोप पावली आणि ‘करहाटक’ नाव रुढ झाले असावे, असे सांगितले जाते.
‘ल्युडर्स यांच्या मते ‘करहटक’ हेच या शहराचे प्राचीनतम नाव असून, ‘करहाकड’, ‘करहाट’, ‘करहाड’, ‘कऱ्हाड’, आणि ‘कराड’ ही उत्तरकालिन नामांतरे मूळ ‘करहटक’चीच अपभ्रष्ट रूपे होत. सध्या ‘कऱ्हाड’ व ‘कराड’ ही दोन नावे लोकरूढ आहेत.
- कोट
कऱ्हाड हे प्राचीन शहर आहे. अनेक शिलालेखांमध्ये या शहराचे संदर्भ आढळतात. अनेक अभ्यासकांनी शहराच्या नावामागील इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे संदर्भ ग्रंथांवरून दिसते. त्यापैकी काही ग्रंथ मी वाचले आहेत. शहराच्या जडणघडणीला जेवढा प्राचीन इतिहास आहे, तेवढाच ‘कऱ्हाड’ नावालाही मोठा इतिहास आणि वेगवेगळे संदर्भ आहेत.
- रोहिणी शिंदे
नगराध्यक्षा, कऱ्हाड