जिल्हा प्रशासनाकडून सध्या अनलॉकची कार्यवाही सुरू आहे. बाजारपेठेवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत बाजारपेठ खुली राहत आहे. मात्र, तरीही दिवसभर दुकानांमध्ये झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेतील प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून व्यापारी, विक्रेत्यांसह नागरिकांनाही कोरोनाचा पूर्णपणे विसर पडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे गर्दी वाढत असताना दुसरीकडे कोरोना संक्रमणाचा वेगही वाढताना दिसत आहे. गत दहा दिवसात दररोजचा बाधितांचा आकडा दोनशेपेक्षा जास्त आहे. शुक्रवारच्या अहवालात तर तालुक्यात तिनशेहून जास्त बाधित आढळून आले आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. मात्र, तरीही बेफिकिरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
- चौकट
लसीकरणाचा वेग मंदावला
तालुक्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आरोग्य विभागाला पुरेसा लस पुरवठा होत नसल्यामुळे काही ठिकाणी लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. नागरिक लसीसाठी पहाटेपासून रांग लावत आहेत. मात्र, मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना लस न घेता माघारी परतावे लागत आहे.
- चौकट
तालुक्यातील रुग्णवाढ
२१ जून : १९५
२२ जून : १६०
२३ जून : २६६
२४ जून : २१३
२५ जून : २४६
२६ जून : २५५
२७ जून : १०६
२८ जून : २८६
२९ जून : १८८
३० जून : १८८
१ जुलै : ३३९
२ जुलै : २५९