कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कऱ्हाडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले आहेत. सोमवारी दुपारी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून ते मठातून निघून गेले. त्यानंतर ते परतले नसल्याची फिर्याद त्यांचे चुलते शरद बाबूराव जगताप यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते मठातील सेवेकरी निखिल ढमाळ यांना मी बँकेतून जाऊन येतो, असे सांगून मठातून बाहेर पडले. त्यानंतर सेवेकऱ्यांसह वारकऱ्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची वाट पाहिली. मात्र, ते परत आले नाहीत. त्यामुळे सेवेकºयांनी बँक परिसरासह शहरात इतर ठिकाणी त्यांचा शोध घेतला.मात्र, ते कोठेही सापडले नाहीत. त्यामुळे याबाबतची माहिती रात्री उशिरा चुलते शरद जगताप यांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच शरद जगताप यांच्यासह सेवेकरी आणि वारकरी मठात दाखल झाले. त्यांनीही मठाधिपतींचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यामुळे अखेर रात्री उशिरा याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. सहायक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ तपास करीत आहेत.बँकेत पोहोचले; पण नंतर गायबमठाधिपती बाजीरावमामा कऱ्हाडकर हे बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून निघून गेले होते. त्यामुळे सहायक निरीक्षक दीपिका जौंजाळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी कॉसमॉस बँकेला भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी मठाधिपती बँकेत आल्याचे दिसून आले. मात्र, बँकेतून बाहेर पडल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.