कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेने येथील स्मारकाची डागडुजी करत गंजलेल्या कमानीला रंगरंगोटी केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या स्मारकाला आता नवी झळाळी प्राप्त झाली आहे.कोल्हापूर नाका येथे रिमांडहोम परिसरात असलेल्या हुतात्मा स्मारकातील गंजलेल्या व नाव गायब झालेल्या कमानी, परिसरात उंचच्या उंच वाढलेले गवत, झाडांचा पाला-पाचोळ्यांचा साचलेला कचरा असे अस्वच्छतेचे साम्राज्य या सर्व परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’ने संबंधित वृत्ताद्वारे मांडले होते. ‘लोकमत’ने मांडलेल्या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनास जाग आली. पालिकेकडून स्मारकातील दुरवस्थेत असलेल्या कामांची तत्काळ डागडुजी करण्यात आली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागा संपादन करून राज्यात २६८ ठिकाणी शासकीय खर्चाने अशी स्मारके उभारण्यात आली. त्या योजनेअंतर्गंत कऱ्हाडच्या दक्षिणेकडे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवारस्त्याजवळ रिमांड होम परिसरात स्वातंत्र्य लढार्इंमध्ये वीरगती प्राप्त केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे.या स्मारकाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त आहे. मात्र, पालिकेच्या नियोजनशुन्य देखभालीमुळे हे स्मारक शेवटची घटका मोजत होते. शहराबाहेर असल्यामुळे हुतात्मा स्मारक सर्वांच्याच दृष्टीआड राहिले. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी व पालिकेच्या देखभालीकडे असलेल्या या स्मारकाच्या विकासासाठी पालिकेकडून या वर्षी आठ लाखांची तरतूद केली आहे. तसेच स्मारकाची डागडुजी देखील करण्यात आली आहे. हुतात्मा स्मारकामध्ये दर्जेदार सुविधा उभाराव्यात तसेच ते पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावे, यासाठी सध्या पालिकेकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. (प्रतिनिधी) गेल्यावर्षी दीड लाख तर यंदा आठ लाख...कोल्हापूर नाका या ठिकाणी बांधण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेवरती आहे. पालिकेकडून प्रत्येकवर्षी हुतात्मा स्मारकावर करण्यात येणाऱ्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. २०१३-१४ वर्षी ५० हजार रुपयांची तरतूद पालिकेने केली होती. तसेच त्यानंतर गेल्यावर्षी २०१५-१६ वर्षी दीड लाखाची तरतूद केली होती. त्यावेळी किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. मात्र, यंदाच्या वर्षी वार्षिक अर्थसंकल्पात सर्वाधिक आठ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तहसीलदार कार्यालय : १९४२ च्या क्रांती आंदोलनातील मोर्चाच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.नगरपालिका कार्यालय : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.पंचायत समिती कार्यालय : स्वातंत्र्य लढाईत वीरगती प्राप्त केलेल्या शुरवीरांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभकार्वे नाका : आॅलिंपिक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभकोल्हापूर नाका : मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. त्या योजनेअंतर्गत हुतात्मा स्मारक उभारले आहे.
कऱ्हाडच्या हुतात्मा स्मारकाला झळाळी !
By admin | Published: May 18, 2016 9:51 PM