कऱ्हाड : होळीत पोळी पडली की थंडी गायब होते, असं म्हणतात. सध्या होळीचा सण दहा दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र, होळी पेटण्यापूर्वीच उन्हानं रान तापू लागलय. मार्चच्या सुरुवातीलाच पारा ३८ अंशांवर पोहोचलाय. त्यामुळे सकाळी अकरा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. कडक उन्हाळा आणि वातावरणातील उष्णतेमुळे सध्या सर्वजण हैराण झालेत. परिणामी, सावली आणि गारवा मिळविण्यासाठी जो-तो धडपडताना दिसतोय. कऱ्हाड तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या दोन भागांत विभागणी झाली आहे. तालुक्याचा पश्चिमेकडील भाग सदाहरित असलेला दिसतो. या भागात कृष्णा, कोयना नद्यांना बारमाही पाणी वाहते. तसेच या विभागातील विहिरी, जलसिंचन योजना तसेच कूपनलिकांची संख्याही भरमसाठ आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. याउलट तालुक्याचा पूर्वेकडील भाग दुष्काळी समजला जातो. हा भाग डोंगराने व्यापला आहे. तसेच येथे पाण्याची सोय नाही. कृष्णा कॅनॉल वगळता भागात कोठेही नदी अथवा बारमाही ओढा नाही. विहिरींची पाणी पातळीही डिसेंबरअखेरीस खालावते. तलावातील पाणीही जानेवारीतच तळ गाठते. या भागात काही ठिकाणी जलयुक्त शिवारमधून बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या बंधाऱ्यांचाही विभागाला म्हणावा तेवढा फायदा होत नाही. परिणामी, तालुक्यातील सुर्ली व शामगावचा घाट ओलांडताच उन्हाळ्याची मोठ्या प्रमाणात जाणीव होते. या भागात बसणाऱ्या झळा सर्वांनाच हैराण करतात. सध्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते. भरदुपारी रस्त्यावर येताच घामाच्या धारा सुरू होतात. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत कडक ऊन जाणवते. या कालावधीत रस्तेही ओस पडत असल्याचे सध्या दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणारे हेल्मेट घालून अथवा डोक्यावर रूमाल टाकूनच मार्गस्थ होतायत. तसेच कडक उन्हात गारवा मिळावा, यासाठी सरबत तसेच ज्युसच्या गाड्यांवर गर्दी होताना दिसते.बाजारपेठेमध्ये सध्या विविध प्रकारच्या सरबतांबरोबर लिंंबू, कोकम, उसाचा रस, ताक, लस्सी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यासारखे थंडगार पेय उपलब्ध झाली आहेत. सरबत तयार करताना साखरेच्या पाकात नारंगी, हिरवा, निळा यासारखे रंग टाकले जात आहेत. त्यामुळे सरबतांना आकर्षक रंगही प्राप्त होत आहे. अशा रंगीबेरंगी सरबतांची मागणीही सध्या वाढली आहे. याशिवाय नारळ पाणी, कलिंगडांच्या फोडींनाही मोठी मागणी असल्याचे दिसते. शहरात बसस्थानक परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसर, दत्त चौक, भाजी मंडई परिसर अशा ठिकाणी कलिंगड विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ठेवले आहेत. तर कलिंगडासोबत द्राक्षेही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. ऐंशी ते शंभर रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री केली जात आहे.प्रत्येक ऋतूचे काही विशेष असतात. या ऋतूची गरजही वाटते आणि त्याचवेळी तो नकोसा वाटतो. कडाक्याच्या थंडीनंतर उबदार ऊन पडले की, सुखद वाटते. परंत ही भावना वैशाखापर्यंत टिकत नाही. हा वैशाख वणवा जोरात असताना अंगाची लाहीलाही होते. उष्णतेचाही खूप त्रास होतो. घराबाहेर पडणे आणि फिरणे अवघड होऊन बसते. त्याचवेळी उष्माघाताचा तडाखा बसून झालेल्या त्रासाच्या बातम्या ऐकायला मिळतात. या काळात अनेक गोष्टी टाळणे गरजेचे असते. त्या टाळल्यास आरोग्य उत्तम राहते. (प्रतिनिधी)
कऱ्हाडचा पारा @ 38 अंश सेल्सिअस !
By admin | Published: March 02, 2017 11:47 PM