कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून संशयीतरीत्या बेपत्ता झाले आहेत.त्यांचा भ्रमणध्वनीही त्यावेळेपासून बंद असल्याने चाळीस तास लोटूनही खाकीचा तपास सुरूच आहे. वारकरीही त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करताहेत. मात्र, त्यांचा फोन कधी बंद नसल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून बाहेर पडलेले बाजीरावमामा परत आलेच नाही. याची फिर्याद चुलते शरद बाबूराव जगताप यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला.गत दीड वर्षापासून मठाधिपती म्हणून काम पाहणारे बाजीरावमामा कराडकर संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी दिवसभर कराडकर मठात वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. विश्वस्तव मठाधिपती यांच्यातील संघर्षामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा उपस्थितांत सुरू होती.
दुपारी पाच वाजता शेकडो वारकऱ्यांनी पोलिसांना मठाधिपतींचा शोध घ्या, त्यांच्या जीवितास धोका पोहोचल्यास विश्वस्तांना जबाबदार धरा, अशा आशयाचे निवेदन दिले. त्यामुळे वारकरी सांप्रदायातील वाद चव्हाट्यावर आला आहे; पण त्याचबरोबर चाळीस तास लोटूनही बाजीरावमामांचा शोध लागत नाही म्हटल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बाजीरावमामा कराडकर यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड जात आहे. तपास गोपनीय असल्याने अधिक माहिती देता येत नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.-दीपिका जौंजाळतपासी पोलीस अधिकारी, कऱ्हाड