कऱ्हाड : शहरात दोन रस्त्यांंवर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी भविष्यातील वीस वर्षांतील वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी शहर पोलिसांनी वाहतूक आराखड्याचा सुधारित प्रस्ताव कऱ्हाड पालिकेस नुकताच सादर केला आहे. या सुधारित प्रस्तावात आणखी तीन रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरू करण्याचे तर दोन चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपालिकेच्या मंजुरीनंतर पोलिसांकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील बनत आहे. शहरातील वाहनांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. पार्किंगसाठी जागेच्या मर्यादा येत आहेत. शहरातील अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढणारी संख्या यामुळे वाहतुकीचा प्रश्न उग्ररूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर २०१५ मध्ये पालिकेने वाहतुकीच्या संदर्भात केलेल्या आठ ठरावांपैकी सरस्वती विद्यामंदिर ते टिळक हायस्कूल व पांढरीचा मारुती मंदिर ते डॉ. एरम हॉस्पिटल या दोन रस्त्यांवरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. अन्य ठरावांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय कृष्णा घाट परिसरातील पार्किंगव्यवस्था, जड वाहनांना बंदी असणारे रस्ते व त्याबाबतच्या वेळा, अतिक्रमण काढणे आवश्यक असलेले परिसर, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक असलेली ठिकाणे आदींबाबत पोलिसांकडून या प्रस्तावात सविस्तर सूचविण्यात आले आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी पालिकेला सादर करण्यात आला आहे. पालिकेच्या मंजुरीनंतर पोलिसांकडून या प्रस्तावाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
कऱ्हाडला वीस वर्षांचा वाहतूक आराखडा
By admin | Published: September 04, 2016 11:49 PM