नवनाथ जगदाळे - दहिवडी --शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली केली अशा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा दहिवडी येथे असून, त्यासमोर सध्या दुकानदारांनी बाजार मांडला आहे. या परिसरात एक दुकान उभा राहते, मोडते तोपर्यंत दुसरे उभे राहते अशी स्थिती येथील आहे. यावर निर्बंध घालणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दहिवडी हे माण तालुक्याचे मुख्यालय आहे. बसस्थानकापासून काही अंतरावर रस्त्याच्या बाजूसच कर्मवीर अण्णांचा पुतळा आहे. दहिवडी येथे रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, शाळा आहेत. त्यामुळे कर्मवीर अण्णांच्या पुतळ्याला विशेष महत्त्व आहे. असे असताना आज दहिवडीत अण्णांचा पुतळा कोठे आहे, याचा शोध घ्यावा लागतो. कारण, या परिसरात दुकाने थाटण्यात येत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने येथे उभी करण्यात येतात. मंडप टाकून येथेच बाजार भरविल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात येते. त्यामुळे हा परिसर बकाल होऊ लागला आहे. येथे दुकान थाटणाऱ्यांना कसे हलवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित दुकानदारांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी दहिवडी नागरिकांतून होत आहे. कर्मवीर अण्णांच्या पुतळा परिसराची स्वच्छता ठेवण्यासंदर्भात ग्रामपंचायत, बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, कारवाई न झाल्यामुळे अतिक्रमण होत आहे. हा परिसर स्वच्छ व सुंदर असला पाहिजे. त्यासाठी आम्हीही सहकार्य करण्यास तयार आहोत.- प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, दहिवडी कॉलेज.
कर्मवीरांचे आवार; बाजाराने बेजार !
By admin | Published: September 11, 2015 9:11 PM