पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास पठार परिसरात गेली पंधरा दिवस अधून-मधून दुपारनंतर तुरळक पावसाच्या सरी पडत होत्या. मंगळवारी रात्रीपासून जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पुष्पपठार काससह सह्याद्रीच्या माथ्यावरील डोंगरामध्ये राहणारे जनजीवन गारठून गेले आहे. तसेच सूर्यदर्शन दुर्लभ होऊ लागले आहे. तसेच बुधवारी दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे नाले, ओढ्यांसह छोटे-मोठे धबधबे खळाळू लागले आहेत.
पश्चिमेकडील डोंगरमाथ्यावरील या परिसरात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासूनच संततधार चालू केल्याने कास, सह्याद्रीच्या माथ्यावरील जनजीवन गारठू लागले आहे. बुधवारी सकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कास परिसरात ऊन-पावसाचा खेळ चालू होता. सकाळी पडणारे ऊन व दुपारनंतर पावसाची सर यामुळे वातावरण विलोभनीय होऊ लागले होते. अचानक जोरदार वारा व वाढलेला पावसाचा जोर यामुळे थंडी प्रचंड वाढू लागली आहे.
अतिवृष्टीच्या या डोंगरमाथ्यावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ढग व धुक्यामुळे सूर्यदर्शन दुर्लभ होते. आताही गेल्या आठ दिवसांचा कालावधी वगळता जूनपासून ऊन दुर्मीळ पडले आहे. त्यामुळे सगळीकडे ओलेचिंब, कोंदट वातावरण निर्माण झाले असून, डोंगरमाथ्यावर कायम दाट धुके पडत आहे. आजच्या पावसाने आटण्याच्या मार्गावर असणारे ओहोळ, ओढे, धबधबे पुन्हा खळाळू लागल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, हा पाऊस डोंगरमाथ्यावरील शेतीस पूरक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
(चौकट)
सततच्या पावसामुळे गालीचे लांबण्याची शक्यता...
कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा हंगाम चालू असून, ऊन-पाऊस अशा वातावरणात फुले चांगल्याप्रकारे फुलतात. येत्या काही दिवसांत फुलांचे गालीचे पाहायला मिळतील, असे वातावरण असताना मंगळवारपासून पडत असलेला जोरदार पाऊस असाच सतत राहिल्यास गालीचे लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
०८पेट्री
फोटो : कास पठार परिसरात सततचा पाऊस व धुक्याने कोंदट वातावरण निर्माण होत असून, जनजीवन गारठू लागले आहे. (छाया : सागर चव्हाण)