पेट्री : ‘जागतिक वारसास्थळ असलेल्या कासचा परिसर व बोटिंग पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या बामणोली परिसराला वणवा लावून उजाड न करता संवर्धन केल्यास निसर्ग आपल्याला काही कमी पडू देणार नाही; पण निसर्गाचा ऱ्हास केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल,’ असे प्रतिपादन मेढा वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी यांनी केले.
वनविभागामार्फत वणवा सप्ताहानिमित्त वनपरिमंडळ बामणोली, कास विभागात जनजागृती मोहीम राबविली त्यावेळी ते बोलत होते.
परदेशी म्हणाले, ‘अलीकडे वणवे लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. डोंगररांगा जळून खाक होत आहेत. बामणोली, कास परिसरात मोठ्या प्रमाणात निसर्गसंपदा आहे. त्याचे आपण जतन केले पाहिजे. वणव्यामुळे पाळीव व वन्यप्राण्यांचा चारा जळून जात असून वन्यप्राणी, त्यांची अंडी, सरपटणारे प्राणी यांना मोठी हानी पोहोचते. लहान-मोठी वृक्षही आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन निसर्गाची हानी होऊन याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. वणवा लावणाऱ्यांची माहिती वनविभागाला द्यावी. डोंगररांगामधील जनावरांचा चारा वणव्यात जळून गेल्याने पुढील वर्षी चांगला येतो. हा लोकांमध्ये असणारा गैरसमज काढावा. आपल्या निसर्गाचे जतन आपणच करावे.’
बामणोलीचे वनपाल अर्जुन चव्हाण, वनरक्षक नीलेेेश रजपूत, एस. ए. शिंगाडे यांनी याकामी पुढाकार घेतला. यावेळी वनमजूर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो १९पेट्री-वणवा
एकीव येथे वणवा बंदी सप्ताहानिमित्त वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. (छाया : सागर चव्हाण)