सातारा: कलम ३७० व ३५ अ या भारतीय राज्यघटनेतील हंगामी तरतुदी होत्या. मात्र त्याचा प्रभाव संपुष्टात आला आहे. काश्मिरला भारताच्या मूळ प्रवाहाशी जोडण्याकरता पॅकेजची गरज नाही तर त्यांच्या दु:खांवर विश्वासाच्या मायेची फुंकर घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विमा कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड वसंतराव नलावडे यांनी केले.इस्माईल साहेब मुल्ला विधी महाविद्यालयाच्या अॅड. व्ही. एन. पाटील स्मृती व्याख्यानमालेचे तिसावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता पवार, क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॉ किरण माने, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, प्रख्यात विधिज्ञ अॅड. धैर्यशील पाटील, अॅड प्रवीण देशपांडे, आनंद ओक उपस्थित होते.
'कॉ नलावडे म्हणाले, काश्मीर हे राज्य भारताचेच आहे. त्यामुळे सर्वांनी मनातील गोंधळ दूर करा. काश्मीर राज्यात शांततापूर्ण परिस्थिती आहे. केवळ श्वास घेण्याइतपत स्वातंत्र्य आहे. पुढील योजनांच्या अंमलबजावणीचा तपशील केंद्र सरकारकडे आहे.
४ आॅगस्टला केंद्राकडून ज्या पद्धतीने राजकीय पध्दतीने हालचाली सुरू होत्या. त्यानुसार राज्यात काहीतरी मोठ्या हालचाली घडणार हे अपेक्षित होते. भारतीय जीवन पध्दतीच्या मूळ प्रवाहाशी काश्मिरी लोकांचे मनोमिलन घडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज आहे. मात्र कायदा आणि मनोमिलन या दोन स्वतंत्र व दोन धृवावरच्या गोष्टी आहेत.कॉम्रेड वसंतराव नलावडे पुढे म्हणाले, गेल्या एकोणतीस वर्षात काश्मीरमधून बेचाळीस हजार काश्मिरी पंडितांचे विस्थापन झाले. त्यामुळे १९५२ च्या दिल्ली करारातील जनमताचा मुद्दा आता कालबाह्य ठरला आहे. प्रत्येक वेळी ३७० च्या आडोशाने राजकीय अगतिकतेचा संभ्रम वारंवार तयार करण्यात आल्याने काश्मिरी जनता अतिरेकी व राज्यकर्ते यांना वैतागली आहे.
काश्मिरी लोकांना पॅकेजची गरज नाही तर त्यांना रोजगार, शिक्षण, सुरक्षितता यांचा विश्वास देण्याची गरज आहे. काश्मीरची अर्थव्यवस्था सफरचंदाच्या बागावर अवलंबून आहे. येथे तीन महिने हंगाम असतो त्या हंगामातील रोजगाराला संधी मिळाली नाही तर प्रचंड उद्रेक होण्याची भीती नलावडे यांनी व्यक्त केली.काश्मीर प्रश्न हा भारताचा अंर्तगत प्रश्न आहे, हे विकसित देशांनी मान्य केले आहे. मात्र जागतिक पातळीवर अति भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाल्याने ही मान्यता किती काळ टिकेल, याची शाश्वती नाही. लोकशाहीचा नागरिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक झाला आहे. त्यामुळे सामान्यांचा आवाज येथे ऐकला जाणार नाही. ती परिस्थिती काश्मीरमध्ये येऊ नये याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नलावडे यांनी सांगितले.अॅड प्रवीण देशपांडे, व आनंद ओक यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्राचार्य सुजाता पवार यांनी प्रास्तविक केलेपोलिसांकडून नोटीस..भारतीय राज्यघटना व ३७० कलम या विषयावर अॅड. वसंतराव नलावडे यांच्या व्याख्यानाला भाजपच्या कार्यकत्यार्नी आक्षेप घेतला होता. कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणून इस्माइल मुल्ला लॉ कॉलेजच्या महाविद्यालयात शहर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
शहर पोलिसांनी नलावडे यांना १४९ ची नोटीस बजावली होती. महाविद्यालय व्यवस्थापनानेही परिस्थिती संयमाने हाताळली. भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, अमीत कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनीही व्याख्यानाला उपस्थिती दर्शविली. कोणताही अनुचित प्रकार न घडता व्याख्यान पार पडले.