पुसेगाव : काटेवाडी (ता. खटाव) येथील मानाप्पा शेतकरी गटाने सोयाबीन बीजनिर्मितीत यशस्वी पाऊल टाकले असून, कृषी विभागाच्या सहकार्याने २३ एकरांवर ‘फुले संगम केडीएस ७२६’ या सोयाबीन वाणाचे विक्रमी बीजोत्पादन घेऊन २५ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. या शेतकरी गटाने निर्माण केलेल्या गुणवत्तापूर्ण बियाण्याला राज्यभरातून प्रचंड मागणी असून, सातारा जिल्ह्यासह विदर्भातील वाशिम येथील शेतकऱ्यांनीही या बियाण्याला पहिली पसंती दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळात काटेवाडी येथील शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना बीजोत्पादनाची गरज व फायदे पटवून देण्यात आले. याच बैठकीत मानाप्पा शेतकरी गटाची स्थापना करून बीजोत्पादनाची रुपरेखा आखण्यात आली. या बीजनिर्मिती प्रयोगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी सुरुवातीला शेतीतज्ज्ञांतर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. बीजोत्पादनाचे फायदे, एकात्मिक कीड नियंत्रण व खत व्यवस्थापन याची सखोल माहिती देण्यात आली.
शेतकरी संवाद, प्रकल्प भेट व शेतीदिनाचे आयोजन करून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला. कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘फुले संगम केडीएस ७२६’ या पायाभूत वाणाची गटातील १४ शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून बीबीएफ यंत्राद्वारे २३ एकरांवर पेरणी केली. पेरणीनंतर या क्षेत्राची जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा, सातारा यांच्याकडे नोंदणी करण्यात आली.
ऑक्टोबरमध्ये मळणी केल्यानंतर पायाभूत बियाणे वापरण्याचा फायदा शेतकऱ्यांच्या लक्षात आला. एरव्ही सोयाबीन पिकात एकरी आठ क्विंटलचा उतार मिळत होता. मात्र, पायाभूत बियाण्याचा वापर केल्याने उत्पादनात एकरी १३ ते १५ क्विंटलची वाढ झाली.
चौकट...
बियाण्याची माफक दरात विक्री
शेतकरी गटाच्या नावे बियाणे विक्री परवाना काढल्यानंतर प्रत्येक महिन्यात उगवण क्षमता चाचणी घेतली गेली, ती ९० टक्केपेक्षा जास्त मिळाली. मार्चमध्ये बियाण्याचे प्रोसेसिंग, बॅगींग व टॅगींगची प्रक्रिया पूर्ण करून २५ किलोच्या ८०० बॅगा विक्रीसाठी गटाकडे उपलब्ध झाल्या. कृषी विभाग व गटाच्या माध्यमातूनही बियाणे सातारा जिल्ह्यासह विदर्भातील वाशिम येथील शेतकऱ्यांना (प्रतिकिलो १३० रुपये) इतक्या माफक दरात विक्री करण्यात आले.
(चौकट)
अन्य तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरणार...
स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या गुणवत्तापूर्ण बियाण्याची चर्चा राज्यभर झाली आणि अकोला, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांतून बियाण्याला प्रचंड मागणी वाढली. मात्र, बियाणे संपल्याने शेतकरी गटाला त्यांची मागणी पूर्ण करता आली नाही. मानाप्पा शेतकरी गटाने राबविलेला बीजनिर्मितीचा प्रयोग तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
२४ पुसेगाव
फोटो कॅप्शन :
काटेवाडी (ता. खटाव) येथील मानाप्पा शेतकरी गटाचे सभासद व कृषी सहाय्यक संतोष नेवसे यांनी फुले संगम वाणाचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी पाठविले.
(छाया : केशव जाधव)