कोरेगाव : ‘कोरेगाव तालुक्यातील पवारनिष्ठ स्वाभिमानी विचार मंचचे सदस्य एकत्र जो निर्णय घेतील, तो मला मान्य राहील. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील. वाट्टेल त्या परिस्थितीत या मतदारसंघात दंडेलशाही चालू देणार नाही. एक लक्षात ठेवा, सर्वांच्याच घरात काठ्या आणि कुऱ्हाडी आहेत,’ अशा स्पष्ट शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता इशारा दिला.
राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्याशी निष्ठावंत असलेल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी विचार मंचच्या माध्यमातून एकी केली आहे. एकसळ येथे अॅड. पी. सी. भोसले यांच्या माध्यमातून झालेल्या स्वाभिमानी विचार मंचच्या बैठकीस खा. उदयनराजेंनी हजेरी लावली होती. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये चांगलीच टीका टिप्पणी केली. यावेळी सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, शहाजी क्षीरसागर, नानासाहेब भिलारे, अजय कदम, अॅड. विजयसिंह शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे, कोरेगावचे उपनगराध्यक्ष जयवंत पवार यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, ‘२० वर्षे कशी गेली, माहीत नाही. आपण माझ्यावर प्रेम केले. प्रेम आणि नाते मनापासून जुळले पाहिजे. प्रेम काय पुस्तकात गोष्टी वाचून होत नाही. तुम्ही सर्वांनी जे ठरवाल ते ठरवा, सर्व ठिकाणी मी... मी.... कशासाठी, काय घडले जावळीत. त्याचे पडसाद उमटायचे ते उमटले. ज्यावेळी काम काढायची वेळ येईल, त्यावेळी काम काढणार. प्रतिनिधित्व आपल्याकडे असताना सामान्य जनतेचा विसर पडला नाही पाहिजे.
तुम्ही मला दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.’ ‘कोरेगावात काही कमी नाही. कोरेगावची खंत वाटते की ते कधीही एकत्र येत नाहीत. ऐनवेळेस कोण कोठे जाईल, हा तुमचा प्रश्न. तुम्ही निर्णय घेतला तर तो एकासाठी लागू होत नाही. पक्षात वरिष्ठ आहेत, ते पाहत आहेत,’ असेही खा. उदयनराजेंनी स्पष्ट केले.नेतृत्व बदलण्याची मागणी करणार...या कार्यक्रमात सुनील खत्री, विठ्ठलराव कदम, अजय कदम, अनिल बोधे, नानासाहेब भिलारे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडत, पक्ष नेतृत्वाकडे आपण मतदारसंघातील नेतृत्व बदलण्याची मागणी करू या. वेळप्रसंगी चिठ्ठी टाकू, सामान्य उमेदवार असला तरी त्याच्या पाठीशी राहू, असा निर्धार यावेळी करण्यात आला.एकसळ, ता. कोरेगाव येथे खा. उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विठ्ठलराव कदम, अनिल बोधे, शहाजी क्षीरसागर, सुनील खत्री, जयवंत पवार, अॅड. पी. सी. भोसले, अॅड. विजयसिंह शिंदे आदी उपस्थित होते.