संजय पाटील--कऱ्हाड --काठीला सोनं बांधून फिरण्याचाही एक काळ होता, असं म्हणतात; पण सध्या कडी-कुलपातलं सोनंही सुरक्षित राहिलेलं नाही. फक्त रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही सोनं लुटलं जातंय. त्यामुळे सोनं सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागतायत. कऱ्हाडच्या मुख्य बाजारपेठेत सोन्या-चांदीची अनेक दुकाने आहेत. या दुकानांतून दागिने चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडतायत. मात्र, व्यावसायिक या घटनांकडे म्हणाव्या तेवढ्या गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. परिणामी, सुरक्षेच्यादृष्टीने आता पोलिसांनीच या व्यावसायिकांशी पत्रव्यवहार सुरू केलाय.कऱ्हाडसह पाटण, कडेगाव, शिराळा, वाळवा या तालुक्यांसाठी येथील बाजारपेठ मध्यवर्ती ठिकाण आहे. या तालुक्यांतील शेकडो नागरिक दररोज खरेदीसाठी कऱ्हाडला येत असतात. कऱ्हाडात प्रत्येक वस्तू उपलब्ध होत असल्याने आसपासच्या तालुक्यातील नागरिकांचा ओढा येथील बाजारपेठेकडे आहे. वाढती ग्राहकसंख्या लक्षात घेता येथे अनेक मोठमोठी शोरूम थाटण्यात आली आहेत. त्यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या शोरूमची संख्याही जास्त आहे. त्याबरोबरच दत्त चौकापासून आझाद चौक मार्गे चावडी चौक व चावडी चौकातून कन्या शाळेमार्गे कृष्णा नाक्यापर्यंत मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतही सोन्या-चांदीची शेकडो दुकाने आहेत. या दुकानांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर दागिन्यांची खरेदी-विक्री होते. अनेक नामांकित व्यापाऱ्यांनी याच पेठेत नव्याने दुकाने सुरू केली आहेत. मात्र, दिवसेंदिवस सराफकट्टा वाढत असताना येथे पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना आढळून येत नाहीत. शहरातील मुख्य बाजारपेठेत यापूर्वी दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत. धूमस्टाईल चोरीसह दुकानांतूनही दागिने चोरीस गेले आहेत. त्याबाबतच्या तक्रारीही पोलिस ठाण्यात गेल्या आहेत. मात्र, संबंधित प्रकरणांतील बहुतांश प्रकरणे अद्यापही उघडकीस आलेली नाहीत. चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात किंवा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. शहरातील मुख्य बाजारपेठेत पोलिसांची दिवसाही गस्त सुरू असते. मात्र, चोरीच्या घटना रोखण्यासाठी किंवा त्यावर अंकुश आणण्यासाठी सराफ व्यावसायिकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. सराफ व्यावसायिकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी वारंवार पोलिसांकडून सूचना करण्यात येतात. या सूचनांप्रमाणे काही व्यावसायिक सुरक्षात्मक उपाययोजनाही करतात. मात्र, काहीजण या सूचनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने चोरीच्या घटना रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसते. सध्या बाजारपेठेतील वाढलेली आर्थिक उलाढाल लक्षात घेता पोलिसांनी सराफ व्यावसायिकांशी पुन्हा एकदा पत्रव्यवहार सुरू केला आहे. शहर पोलिस ठाण्याच्या वतीने प्रत्येक सराफ व्यावसायिक तसेच असोसिएशनला पत्र पाठविण्यात आले असून, दुकानांच्या सुरक्षेसाठी दिवसा व रात्रीही सुरक्षारक्षक नेमावा, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानाला एक रक्षक नेमणे शक्य नसेल तर पाच ते सहा व्यावसायिकांनी एकत्रितपणे एक सुरक्षारक्षक नेमावा व त्याचा खर्च सर्वांनी मिळून करावा, असेही पोलिसांनी सुचविले आहे. दुकानासमोर सुरक्षारक्षक उभा असल्यास चोरीच्या घटनांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल. दुकानांतून होणाऱ्या चोरीसह धूमस्टाईल चोरीच्या घटनाही कमी होतील, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. सध्या पत्र पाठवून त्याबाबतच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. मात्र, लवकरच सर्व सराफ व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना इतर सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येणार आहे. हातचलाखी होऊ द्या कॅमेराबद्ध !सराफ दुकानांमध्ये उघडउघड होणाऱ्या चोरीपेक्षा हातचलाखीने होणाऱ्या चोरीच्या घटनांची संख्या जास्त आहे. अनेकवेळा व्यावसायिकाची नजर चुकवून दागिना चोरला जातो. ही चोरी सहज पकडता येणे शक्य नसते. त्यामुळे प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी सक्त सूचना पोलिसांनी केली आहे. दुकानात सीसीटीव्ही असेल तर चोरट्याची हालचलाखी व त्याच्या इतर हालचाली लक्षात येऊ शकतात. तपासात संबंधित चोरट्याला पकडण्यासही फुटेजची मदत होते. पाच टक्के दुकानात रक्षककऱ्हाडात सोन्या-चांदीची मोठमोठी दुकाने असताना फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपत दुकानातच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. सध्या जास्तीत जास्त पाच टक्के दुकानातच सुरक्षा रक्षकांची नेमणूक आहे. संबंधित दुकानात सकाळपासून रात्रीपर्यंत रक्षक उभे असतात. मात्र, इतर दुकानदार फक्त सीसीटीव्हीच्या भरवशावर आहेत. काही दुकानांत तर अद्याप सीसीटीव्हीही बसविल्या नाहीत, हे विशेष.‘डीव्हीआर’ दुसऱ्या दुकानातसराफ दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्याच्या व फुटेजही चोरून नेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. चित्रीकरण संकलित राहणारा डीव्हीआर दुकानात लपून राहणे शक्य नसते. त्यामुळे पोलिसांनी फुटेज सुरक्षित राहावे, यासाठी व्यावसायिकांना क्लृप्ती सुचविली आहे. सीसीटीव्ही फुटेज संकलित राहणारा डीव्हीआर नजीकच्याच दुसऱ्या दुकानात ठेवावा, असे पोलिसांनी सुचविले आहे. ज्यामुळे एखाद्या दुकानातील कॅमेरा चोरट्यांनी फोडला तरी त्याचे फुटेज सुरक्षित राहू शकते.व्यापारी असोसिएशनची पोलिसांची चर्चाशहरातील मुख्य बाजारपेठेत वेगवेगळ्या दुकानांची रेलचेल आहे. या दुकानांतून किरकोळ चोरीच्या घटना वारंवार घडतात. काही घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचतात. मात्र, काहीवेळा चोरीस गेलेली वस्तू अथवा माल किरकोळ किमतीचा असल्याने व्यापारी याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात करीत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावते. व्यापारी व व्यावसायिकांनी अशा चोरीच्या घटना पोलिस ठाण्यास कळवाव्यात. तसेच सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून दहा ते पंधरा दुकानदारांनी मिळून दुकानांच्या दिशेने सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. सुरक्षारक्षकही नेमावा, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. त्यासाठी पोलिसांनी व्यापारी असोसिएशनची बैठक घेऊन चर्चा केली आहे.कऱ्हाडच्या बाजारपेठेत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते. बाजारपेठेत पोलिसांची गस्त सुरू असली किंवा प्रत्येक चौकात एक कर्मचारी नेमणुकीस असला तरी दुकानांच्या आत होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी व्यापारी व व्यावसायिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठीच्या काही उपाययोजना आम्ही सुचविल्या आहेत. व्यापारी, संघटना, असोसिएशन व प्रत्येक व्यावसायिकाशी आम्ही पत्रव्यवहार केला आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. - प्रमोद जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कऱ्हाडफ्रन्ट कॅमेरा समोरच्या दुकानावरदुकानासमोर घडणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी अनेक व्यावसायिक समोरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरा लावतात. मात्र, अशा पद्धतीने कॅमेरा लावण्यापेक्षा आपल्या दुकानाच्या दिशेने समोरील दुकानावर कॅमेरा लावला तर त्याचा आणखीही फायदा होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी ‘फ्रन्ट कॅमेरा’ समोरील दुकानावर लावावा, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. वैद्यकीय व्यावसायिकांनाही सूचनाकऱ्हाड शहरात अनेक रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत दररोज शेकडो रुग्ण अॅडमिट होत असतात. तसेच अनेक रुग्णांना ‘डिस्चार्ज’ही मिळतो. संबंधित रुग्णासमवेत त्याचे नातेवाईकही रुग्णालयात थांबतात. काहीवेळा रुग्णालयातून रुग्णाचे किंवा त्याच्या नातेवाइकांचे दागिने चोरीस जातात. त्यामुळे हे रोखण्यासाठी रुग्णाला अॅडमिट करतानाच रुग्णालय व्यवस्थापनाने नातेवाइकांना दागिन्यांची सुरक्षेबाबत योग्य त्या सूचना कराव्यात. रुग्णालयात दागिने ठेवू नयेत, अशी सक्त ताकीद द्यावी, असे पत्र शहर पोलिसांनी प्रत्येक रुग्णालय व्यवस्थापनाला दिले आहे.
सोनं असू द्या कुलपात; पण रक्षक हवाच!
By admin | Published: November 05, 2016 12:22 AM