सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर नव्याने बसविण्यात आलेल्या दरवाज्यामुळे किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे; मात्र मानवेतर घटक विशेषत: वन्यजीवांच्या हालचालींना कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे मत रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळाने व्यक्त केले आहे. हा दरवाजा कायमस्वरूपी उघडाच ठेवावा, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली असून, तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अजिंक्यतारा परिसर अनेक वन्यजीवांचे वसतिस्थान आहे. परिसर जैवविविधतेने समृद्ध असल्याने कायमस्वरूपी निवासी आणि स्थलांतरित वन्यजीव येथे आहेत. त्यातील बिबट्या हा संवेदनशील प्राणी सध्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले असून, बिबट्याची मादी आणि पिलांचे दर्शन वारंवार होते. दक्षिणेस घनदाट जंगल, कचरा डेपो, उंटाचा डोंगर या ठिकाणी अन्नाची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने वन्यजीवांचा वावर आहे. परंतु हे जीव यवतेश्वर, जकातवाडी अशा आजूबाजूच्या भागात संचार करताना आढळतात. नुकतेच दोन बिबटे महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडले, तर एक तरस जखमी झाले. अन्न व पाण्याचा शोध, जोडीदाराचा शोध, स्वत:च्या वावरक्षेत्राचे रक्षण, सीमानिश्चिती अशा अनेक बाबी त्यांच्या स्थलांतरासाठी कारणीभूत असतात. वनक्षेत्र आणि मानवी क्षेत्र या सीमा त्यांना समजत नसल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उभा राहतो. किल्ल्याच्या दक्षिण बाजूकडून वर येण्यासाठी दक्षिण दरवाजा हा एकच मार्ग वन्यजीवांना उपलब्ध आहे. किल्ल्यावर बारमाही पाणीसाठा असून, पाण्यासाठी वन्यजीव त्याचा वापर करतात, असे आढळले आहे. शेजारील जंगलातून अनेक प्राणी दक्षिण दरवाज्याच्या मार्गाने रात्रीच्या वेळी किल्ल्यावर येतात. तो बंद राहिल्यास स्थलांतराचा मार्ग खुंटण्याची शक्यता आहे. म्हणून तो उघडाच ठेवावा, अशी अपेक्षा संस्थेच्या अध्यक्षा सीमांतिनी नूलकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, सचिव विशाल पाटील व सदस्यांनी या निवेदनात व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत सूचना४दक्षिण दरवाजा ३६५ दिवस, २४ तास उघडाच राहील अशी दक्षता घ्यावी.४या दरवाज्याला एक दिंडी दरवाजाही आहे. परंतु वन्यजीवांच्या मानसशास्त्राचा विचार करता दिंडी दरवाजा उघडा ठेवल्यास त्याचा वापर वन्यजीवांकडून होण्याची शक्यता नगण्य आहे.४ समाजकंटक, खोडसाळ व्यक्तींकडून हा दरवाजा बंद केला जाऊ शकतो; त्यामुळे तो बंद करताच येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात यावी.
दक्षिण दरवाजा उघडाच ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2015 9:29 PM