आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिन सामाजिक न्यायदिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक विभागाने आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी आणि सामाजिक न्यायदिन साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा शक्ती प्रदत्त समितीची बैठक मंगळवारी पाड पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.
सुरुवातीला समाज कल्याण सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करुन माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी सिंघल यांनी नियोजनाबाबत सविस्तर आढावा घेतला. त्या म्हणाल्या, आरोग्य विभागाने सुसज्ज रुग्णवाहिका ठेवावी. नगरपालिकेने साफसफाई, स्वच्छता यावर विशेष लक्ष द्यावे. पोलिस विभागाने योग्य बंदोबस्त ठेवावा. विद्यार्थ्यांच्या दिंडीचे नियोजन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करावे. विविध महामंडळांनी चित्ररथ, विविध योजनांचे फलक याची तयारी करावी. सर्वच विभागांनी आपापसात समन्वय ठेवून आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. यामध्ये कोणतीही हलगर्जी होता कामा नये. याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.बैठकीला विविध महामंडळाचे तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.