खंडाळा : केसुर्डी एमआयडीसीतील ग्लोबल इंडिया व ओरिएंटल ईस्ट या कंपन्यांमधील रसायनयुक्त दुर्गंधीमुळे शेती, पशुधनासह मानवी आरोग्यास हानी पोहोचत आहे. या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी करूनही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने बुधवारी अर्धनग्न मोर्चा सुरू करण्यात आला आहे.संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी संघटनेचे प्रमोद जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिलेले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ उपप्रादेशिक कार्यालयाला निवेदन दिलेले होते. एल्जीन ग्लोबल इंडिया व ओरिएंटल ईस्ट या कंपन्यांमधून बाहेर टाकण्यात येणारी रसायनयुक्त राख व द्रवाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. मागील चार वर्षांपासून हजारो टन राख खड्डे काढून त्यात गाडण्यात येते तसेच रासायनिक द्रवही याच खड्ड्यांमध्ये सोडण्यात येत आहे. परिणामी हे घटक जमिनीत मिसळत आहेत, त्याचा अंश भूगर्भात मिसळत आहे. या कंपनीच्या उत्पादनातून निघालेल्या टाकाऊ रासायनिक द्रवाची अवैधरित्या विल्हेवाट लावण्यात येत आहे. त्यामुळे केसुर्डी व बावडा परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यातील रासायनिक घटक जमिनी व जलसाठ्यांमध्ये आढळून येत असून, मानवी आरोग्यासही घातक ठरत आहेत.या कंपन्यांकडून शासनाच्या प्रदूषणाबाबतच्या निकषांची पायमल्ली केली जात आहे. याबाबत प्रदूषण नियामक मंडळाकडे वारंवार तक्रार देऊनही त्यांच्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घेऊन केसुर्डी ग्रामस्थांनी अर्धनग्न मोर्चा खंडाळा तहसील कार्यालयापासून सुरू केला आहे.
Satara: केसुर्डीतील कंपन्यांवरील कारवाईसाठी ग्रामस्थांचा अर्धनग्न मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 7:28 PM