अरुण पवार - पाटण -तालुक्यासाठी पूर्णवेळ पोलीस उपअधीक्षक अधिकाऱ्याची नेमणूक आहे, कार्यालय आहे. तरीही गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयासाठी स्थिर पोलीस उपअधीक्षकांची शोधाशोध सुरू आहे. नुकतेच विधानसभा निवडणुकीपुरते आलेले पोलीस उपअधीक्षक अल्ताफ मोमीन हे निघून गेल्यानंतर पाटणचे पोलीस उपअधीक्षक कार्यालय नव्या अधिकाऱ्याची वाट पाहत आहे.तालुक्यात पाटण, कोयना, ढेबेवाडी येथे स्वतंत्र पोलीस ठाणी आहेत. तारळे, चाफळ, मल्हारपेठ येथे दूरक्षेत्र आहेत. तालुक्यातील कोयना धरणाची सुरक्षा महत्त्वाची असून, याची जबाबदारी पोलीस उपअधीक्षकांवरच येते. त्यामुळे पाटणचे पोलीस उपअधीक्षक पद तितकेच महत्त्वाचे मानले जाते. तरीही पाटणकडे पोलीस विभाग गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येते. तत्कालीन पोलीस अधीक्षक शिवाजीराव शिंदे यांच्या स्थिर कालानंतर पाटणच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचा जम बसेना असे चित्र आहे. शिंदे यांच्या नंतर फत्तुलाल नायकवाडी हे अधिकारी आले. ते संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित होते. मात्र, त्यांना आजारपणात दीर्घ कालावधीसाठी रजा घ्यावी लागली. त्यानंतर एक-दोन वर्षांसाठी पाटणचा उपअधीक्षक पदाचा कारभार कऱ्हाडच्या पोलीस उपअधीक्षकांवर अवलंबून राहिला. जातिवाचक शिवीगाळ किंवा एखादा मोठा गुन्हा पाटण तालुक्यात घडला तर कऱ्हाडचे पोलीस अधिकारी पाटणला येत असतात. दीपक हुंबरे यांची पाटणला नेमणूक झाली. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे त्यांची बदली झाली अन् पुन्हा कार्यायल अधिकाऱ्याविना अशी गत झाली आहे.आता कार्यभार कऱ्हाडकडे विधानसभा निवडणूक आली, त्यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगली येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अल्ताफ मोमीन यांची पाटणला बदली केली. त्यांनी निवडणूक पार पाडली आणि ते परत गेले. आता पाटणचा कार्यभार कऱ्हाड येथील पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांच्याकडे आहे. पाटणच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाचा कार्यभार सध्या कऱ्हाडच्या वरिष्ठांकडे आहे. येथे नवीन अधिकारी व नेमणुकीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतो.-विकास धस, पोलीस निरीक्षक पाटण
‘खाकी’ केवळ निवडणुकीपुरतीच!
By admin | Published: November 17, 2014 10:07 PM