- श्रीमंत ननावरे
खंडाळा : सातारा-पुणे आशियाई महामार्गावर दळणवळणाची सुविधा गतीने व्हावी, यासाठी खंबाटकी घाटातून बोगद्याचा मार्ग बनविण्यात आला आहे. मात्र खंबाटकीच्या या जुन्या बोगद्यात सध्या सुविधांची वानवा जाणवत आहे. विशेषतः विद्युतीकरणासाठी बोगद्याच्या छतावर लटकविण्यात आलेले लोखंडी खांब निसटून ते वाहनांवर कोसळू लागले आहेत. त्यामुळे बोगद्यातील प्रवास धोक्याचा बनत आहे. साहजिकच येथून प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे ठरत आहे.
खंबाटकी बोगद्यामुळे घाटातील वाहतूक एकेरी करण्याची सोय निर्माण झाली. प्रवासाचा वेळही वाचत आहे. मात्र बोगद्यातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. बोगद्यातील रस्त्याची दुरुस्ती केली असली तरी पुन्हा खड्डे पडू लागले आहेत. त्यातच बोगद्यातून रस्त्याच्या बाजूने असणारे संरक्षक लोखंडी ग्रील गायब आहेत. त्यामुळे सुरक्षेची सुविधाच कोलमडली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असणारी गटार व्यवस्थाही मोडकळीस आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी बोगद्यातील रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यामुळे रस्ता घसरडा बनून छोट्या वाहनांना अपघाताचा धोका वाढला आहे.
साधारणतः सहाशे ते आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यात प्रकाशाची सुविधा करण्यासाठी सुमारे २६० लोखंडी गरडल छतावर अडकवून त्यावर विद्युत उपकरणे लावण्यात आली आहेत. मात्र हे गरडल सध्या निकामी होऊन खाली कोसळत आहेत. चार दिवसांत दोन वेळा हे लोखंडी खांब एका ट्रकवर व एका कारवर कोसळले. यामध्ये वाहनांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे या भीतीने वाहनचालकांना सावधपणे जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
गुणवत्ता तपासणी महत्त्वाची...या बोगद्यातील सुविधांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे आहे. मात्र येथील संरक्षक ग्रील गायब झाले तरी याकडे डोळेझाक करण्यात आली. ड्रेनेजची दुरवस्था झाली तरीही त्याकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र सध्या लोखंडी गरडल कोसळू लागल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. बोगद्याच्या निर्मितीपासून आजतागायत त्यावर दुरुस्ती झाली नसल्याने या घटना घडत आहेत. बोगद्यातील वाहतुकीच्या सुरक्षेसाठी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे महत्त्वाचे आहे.
क्रेनची सुविधा गरजेची ...
खंबाटकी बोगद्यात आणि घाट रस्त्यात वारंवार छोटे-मोठे अपघात होत असतात. अशा वेळी महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिस नेहमीच कर्तव्यासाठी तत्पर राहून घटनास्थळी पोहचतात. मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडकलेली वाहने काढणे किंवा अडथळा दूर करण्यासाठी प्राधिकरणाची क्रेनची सुविधा उपलब्ध होत नाही. मुळात तशी सोयच केली नसल्याने अडचणी निर्माण होतात व महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होते. त्यासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे.