सातारा : साताऱ्यातील खणआळी आणि गर्दीचं नातं काही नवं नाही. अरुंद रस्ता, अतिक्रमण, रस्त्यावरील विक्रेते, पार्किंगचा अभाव अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या खणआळीतून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. वाहने व गर्दीतूून वाट काढताना पादचाऱ्यांची मात्र पुरती दमछाक होते; मात्र गर्दी व वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनाने आजतागायत मार्गी लावला नाही.
सातारा शहरातील काही रस्ते प्रशस्त आहेत; परंतु खणआळी, पादशे एक पाटी, तांदूळ आळी येथील रस्ते अरुंद आहेत. अनेक खासगी व मालवाहू वाहनांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. खणआळीला साताऱ्याचे हृदय म्हणून ओळखले जाते. अगदी सुईपासून ते सोन्यापर्यंत सर्वच वस्तू या ठिकाणी उपलब्ध होत असल्याने शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकही खणआळीत खरेदीसाठी येत असतात; मात्र अतिक्रमण, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक कोंडी व गर्दी अशा समस्यांना नागरिकांना कायमच तोंड द्यावे लागते. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीच उपाययोजना न केल्याने हा प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.
(चौकट)
रोज हजारो लोकांची ये-जा
खणआळी ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. कापड, सराफा, किराणा यासह शेकडो दुकाने या भागात आहेत. मंडईत जाण्यासाठी हजारो नागरिकांची याच भागातून ये-जा सुरू असते. या पेठेत सर्वाधिक गर्दी होत असल्याने पादचाऱ्यांची गर्दीतून वाट काढताना अक्षरश: दमछाक होते.
(चौकट)
फूटपाथ कागदावरच
खणआळी व परिसरातील रस्ते अरुंद आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला किरकोळ विक्रेत्यांनी बस्तान बसविले आहे. शिवाय पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या दुतर्फाच वाहने उभी केली जातात. याच मार्गावरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी या मार्गावर कधी फूटपाथची उभारणीच करण्यात आली नाही.
(चौकट)
अतिक्रमण हटाव मोहीम
केवळ दाखवायलाच
या भागातील अतिक्रमणाचा प्रश्न हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला असतो. पालिकेकडून अतिक्रमणे हटविली जातात; मात्र काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे नक्की रस्ता कोणाचा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना कायमच पडत असतो.
(कोट)
आता करणार काय :
आम्हाला भाजी व इतर साहित्य खरेदीसाठी चालतच जावे लागते. दुचाकी आणली तर ती लावायची कुठं हा प्रश्न पडतो. खणआळीत प्रचंड गर्दी असते. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आम्ही करणार तरी काय.
- विनोद भालेकर, सातारा
(कोट)
दुसरा पर्यायच नाही :
घरातील ज्येष्ठ व्यक्तीला सोबत घेऊन गर्दीत जाणे अत्यंत भीतीदायक वाटते; परंतु दुसरा पर्याय नसल्याने आम्हाला धोका पत्करूनच चालत जावे लागते. खणआळीतील गर्दी कधीच नियंत्रणात येऊ शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.
- रोहिणी सावंत, सातारा
(कोट)
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. त्याला यशही आले. खणआळी व परिसरातील रस्ते अरुंद असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. या मार्गावरील अतिक्रमण हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे केले जातील.
- अभिजित बापट, मुख्याधिकारी
फोटो : जावेद खान