खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्यावरून सत्ताधारी दोन गटांतच खडाजंगी झाली. तर या साहित्याची बिले अदा करण्याबाबत मांडलेल्या ठरावाला सत्ताधारी एका गटानेच विरोध दर्शविला. याला विरोधी काँग्रेसच्या गटाने पाठिंबा दिल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी अडचणीत आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीतील नाराजी या मुद्यावरून पुन्हा एकदा उफाळून आली असल्याचे दिसत आहे.
खंडाळा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष शरदकुमार दोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष दयानंद खंडागळे, विरोधी पक्षनेते अनिरुद्ध गाढवे, नगरसेवक लता नरुटे, सुप्रिया गुरव, पंकज गायकवाड, उज्ज्वला गाढवे, शोभा गाढवे, उज्ज्वला संकपाळ, सुप्रिया वळकुंदे, वनीता संकपाळ, प्रल्हाद खंडागळे, दत्तात्रय गाढवे, कल्पना गाढवे, जयश्री जाधव, साजिद मुल्ला, युवराज गाढवे, शामराव गाढवे, स्वप्नील खंडागळे, मुख्याधिकारी निखील जाधव हे उपस्थित होते.
खंडाळा शहरात स्वच्छता राखली जावी, यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक कृत्रिम स्वच्छतागृहे बसविण्यात आली आहेत. तसेच कार्यालयात फर्निचर व इतर साहित्यांची खरेदी करण्यात आली आहे. टेंडरनुसार साहित्य पुरविले नाही. मंजूर केलेली किंमत आणि प्रत्यक्ष दिलेले साहित्य यात तफावत असल्याने ही बिले अदा करू नयेत, अशी सूचना सत्ताधारी पक्षाच्याच उपनेत्या लता नरुटे यांनी मांडली.
मात्र, ही खरेदी शासकीय नियमाप्रमाणेच करण्यात आली आहे. हा खर्च मान्य नसेल तर यावर मतदान घेण्यात यावे, असे नगराध्यक्षांनी सुचविले. या प्रक्रियेत सत्ताधारी पक्षातील पाच नगरसेवकांनी विरोधी पक्षाची साथ घेत विरोधी मतदान केले. १२ विरूध्द ५ मतांनी हा ठराव फेटाळण्यात आला. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी अडचणीत आली, अशी माहिती विरोधी पक्षनेते अनिरुद्ध गाढवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वास्तविक नगरपंचायतीच्या कारभारात विचारात घेत नसल्याने सत्ताधारी पक्षाचाच एक गट नाराज आहे. दोन्ही गटांत या ना त्या कारणाने सतत तू-तू मैं-मैं दिसून आली आहे. सभागृहाबाहेरील राजकारणात नेहमीच या गटाने वेगळे अस्तित्व दाखविले आहे. मात्र, नगरपंचायतीच्या कारभारावर याचा परिणाम होऊ दिला नव्हता.
प्रथमच सभागृहात विरोध झाल्याने राष्ट्रवादीतील नाराजी स्पष्ट झाली आहे. विशेषत: विरोधी काँग्रेसच्या गटाशी वाढलेली जवळीकता भविष्यातील राजकीय घडामोडींची नांदी ठरू शकते.