खंडाळा : खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाने खंडाळा तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा केलेला गुणगौरव इतरांना प्रेरणा देणारा आहे. शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या प्रश्नांसोबतच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. यापुढील काळात तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी संघटनेच्या सभासद शिक्षकांमध्ये स्पर्धा सुरू करावी. ज्या संघटनेच्या शिक्षकांचे जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होतील, त्या संघटनेचा रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात येईल, अशी घोषणा सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी केली.
खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने तालुक्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कबुले बोलत होते. कार्यक्रमाला खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, जिल्हा परिषद सदस्य दीपाली साळुंखे, मकरंद मोटे, शोभा जाधव, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छींद्र ढमाळ, तालुकाध्यक्ष नवनाथ क्षीरसागर उपस्थित होते.
उदय कबुले म्हणाले, शासनाने शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीसाठी सुरू केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीधारक प्रमाण वाढावे यासाठी प्राथमिक शाळेत चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची पूर्वतयारी होण्यासाठी परीक्षा सुरु करणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जिल्हा परिषदेमार्फत या परीक्षेसाठी खास तरतूद केली. मात्र, गेले वर्षभर कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा उपक्रम राबविता आला नाही.
सभापती राजेंद्र तांबे म्हणाले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन आडे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात वर्षभर केलेले अचूक नियोजन व नियंत्रण, मार्गदर्शक शिक्षकांची सचोटी व प्रामाणिक प्रयत्न यामुळे हे यश मिळाले. शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करणारे शिक्षक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करून प्राथमिक शिक्षक संघाने जिल्ह्याला आदर्श घालून दिला आहे. पंचायत समिती बैठकीत शिक्षण विभागाचा आढावा घेताना शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी नियोजन केले. कष्टकरी व मजुरांच्या मुलांना न्याय देण्याचे काम शिक्षकांनी केले. यापुढील काळातही ही बक्षीस योजना कायम सुरू ठेवणार असून, चांगल्या कामासाठी शिक्षक संघटनांसाठीही एक ढाल व रोख बक्षीस देण्यात येईल, असे जाहीर केले.
कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीधारक बारा विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा प्रशस्तीपत्रक, स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छींद्र ढमाळ, नाना शेडगे, तालुकाध्यक्ष नवनाथ क्षीरसागर, शुभांगी ढमाळ, गजानन आडे यांनी मनोगत व्यक्त केले.
फोटो : १७ दशरथ ननावरे/प्रुफ