खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. तालुक्यात गेल्या दहा ते बारा दिवसांत जवळपास साडेचारशे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर ४४३ जण अद्यापही उपचार घेत आहेत. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या साडेचार हजारांपेक्षा जास्त झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. लोकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार दशरथ काळे यांनी केले आहे.
शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर लोकांनी निर्बंध पाळणे बंद केले होते. त्यामुळेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत २१२, लोणंद केंद्रांतर्गत १६७ तर अहिरे केंद्रांतर्गत १०५ अशी एकूण ४४४ झाली आहे. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
खंडाळा तालुक्यातील ६३ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ४,७२३ पर्यंत पोहोचली आहे. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक, विंग या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने धास्ती वाढली आहे. त्यातच कोरोना चाचणी करण्यासाठी विलंब होत असल्याने त्याचे अहवाल उशिरा येत असल्याने अनेक जण तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत.
नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोर करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून लोकांना नियम पाळणे बंधनकारक करायला हवे.
कोट...
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तालुक्यात उपचाराची चांगली सुविधा उपलब्ध असली, तरी अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे. पोलीस प्रशासनानेही नियमांची कडक अंमलबजावणी करून लोकांना नियम पाळणे बंधनकारक करावे.
- दशरथ काळे, तहसीलदार
१७खंडाळा
फोटो : खंडाळा येथे ग्रामीण रुग्णालय कोरोना चाचणीसाठी नागरिक प्रतीक्षेत आहेत.