सचिन काकडे
सातारा शहराच्या जवळपास कोठेही मोठा तलाव अथवा नदी नाही. त्यामुळे हे शहर वसविताना राज्यकर्त्यांनी शहरात सर्वप्रथम पाणी खेळविले. सातारा शहराला प्रथम पाणी आले ते यवतेश्वर मंदिरामागे असलेल्या तलावातून. शहरात पाणी आल्यानंतर प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी पाणी वितरण व्यवस्था वाढविण्यासाठी ती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे हौद व तलावांची निर्मिती करण्यात आली. आज अस्तित्वात असलेली महादरे, मंगळवार, मोती, फुटका, रिसालदार ही तळी त्या काळच्या पाणी व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा होती.
शहराच्या पश्चिमेला असलेल्या महादरे तळ्याची उभारणी १८२३ रोजी करण्यात आल्याची नोंद सरकारी दप्तरी आढळते. २६५ फूट लांब व २५० फूट रुंद व दगडी बांधकाम असलेल्या तळ्याकडे वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिलं जातं. शहरात जेव्हा नवीन राजवाड्याचे बांधकाम झाले तेव्हा बांधकामासाठी मंगळवार पेठेत खोदकाम करून दगड काढण्यात आले. या खड्ड्याच्या ठिकाणी औंधचे पंतप्रतिनिधी यांनी आखीवरेखीव तळे बांधले. पुढे हेच तळे मंगळवार तळे म्हणून ओळखले जाऊ लागले.
शहरातील फुटका तलाव मोती व रिसालदार तळ्यांनादेखील इतिहासाची किनार आहे. त्या काळी पाणी वितरण व्यवस्थेचा सर्वांत महत्त्वाचा दुवा असलेली अनेक तळी व हौद सिमेंटच्या जंगलात लुप्त झाली. सातारा शहराला पूर्वी या हौद व तळ्यातूनच पाणीपुरवठा केला जात होता.
जसजशी लोकवस्ती वाढत गेली, शहराचा विस्तार होत गेला तसतशी पाण्याची गरजही भासू लागली. आज सातारा शहराला कास व उरमोडी नदीवर असलेल्या शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. खापरी लाइनपासून सुरू झालेला पाणी वितरण व्यवस्थेचा प्रवास आता बंदिस्त जलवाहिनीपर्यंत येऊन थांबलाय. पाण्याचे महत्त्व जुन्या लोकांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी तळी व हौदांचे कायमच संवर्धन केले. मात्र, आपण हा ऐतिहासिक ठेवा पुसून टाकण्याचे काम करीत आहोत. पाणी व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा असलेल्या या पाऊलखुणा विस्मृतीत जाण्यापूर्वी त्यांच्या संवर्धनासाठी सातारकरांनी एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे.
फोटो :