मसूर : कराड तालुक्यातील मसूर येथे मसूर विभागातील खरीप हंगामाच्या पूर्व नियोजनाची बैठक निवडक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडळ कृषी अधिकारी रवी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी साहाय्यक संजय जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीत संजय जाधव यांनी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली. सुरुवातीला सोयाबीन व भुईमूग हे स्वपराग सिंचित पीक असल्याने या पिकाचे बियाणे सरळ वानाचे आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. मागील दोन वर्षांतील बियाणे पेरणीसाठी वापरल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो. त्यामुळे ते बियाणे गुणवत्तापूर्ण पेरणी योग्य आहे की नाही, यासाठी उगवण क्षमता तपासणी कशी घ्यावी, याविषयी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
सद्य:स्थितीत परिसरात वळीव पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना हुमणी किडीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी दिवसा खोल नांगरट करणे, होस्ट झाडांवर फवारणी, प्रकाश सापळा, एरंड आंबावन सापळा व जैविक मित्र बुरशीचा वापर या कृषी विभागाच्या पंचसूत्री कार्यक्रमाची सविस्तरपणे माहिती देण्यात आली. तसेच प्रत्यक्षात प्रकाश सापळा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. आडसाली ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी स्वतःची सुपर केन नर्सरी कशा पद्धतीने करावी, जेणेकरून त्यांच्या उत्पादन खर्चात कपात होऊन निरोगी व सुदृढ गुणवत्तापूर्ण रोपे मिळतील याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.