वाई : गेल्या दोन दिवसांपासून वाई शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावत आहे. संपूर्ण तालुक्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे़ धोम-बलकवडी, नागेवाडी ही धरणांसह तालुक्यातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरली आहेत़ परंतु परतीच्या पावसाने शेतकºयास नाकी नऊ आणले असून, खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, मूग, घेवडा, हायब्रीड ज्वारी, भात, आदी पिके काडणीस आली आहे.
शेतकºयांची पीक काढणीची लगबग सुरू आहे़ परंतु रोज दुपारनंतर दमदार पाऊस हजेरी लावत असल्याने काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही ठिकाणी अती पावसाने शेतातच पीक कुजण्यास सुरुवात झाली आहे़.
वाईच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर भात शेती असून, भात काढणीला आले आहे़ अशातच अनेक ठिकाणी भातशेतीत पावसाचे पाणी शिरून व वाºयामुळे हातातोंडाला आलेल्या भात शेतीचे नुकसान झाले आहे़ पावसामुळे फळबागांसह पालेभाज्यांचेही मोठे नुकसान होत आहे.