नम्रता भोसले - खटाव वेदावती (येरळा) नदीतीरावर वसलेल्या खटावला ऐतिहासिक व प्राचीन परंपरा आहे. कर्नाटकातील बारा हळ्ळी गावच्या एका ब्राम्हण व्यक्तीची औरंगजेबच्या काळात ठाणे अमलदार म्हणून नेमणूक झाली होती. या घराण्यातील कृष्णराव खटावकर (दुसरा) यांना शाहू राजांनी शिवशके ५५ मध्ये खटाव गाव इनाम दिले. हेच पूर्वी येथील राजे कृष्णराव खटावकर नावाने सर्वपरिचित होते. खटाव गावात पिंपळेश्वराचे मंदिर आहे. या परिसरात पिंपळ, वडाची फार मोठे झाडे होती. आजही ती पाहावयास मिळतात. या मंदिराच्या दक्षिण बाजूकडून वेदावती नदी वाहते व पश्चिमेकडून कापूर ओढा येरळेस मिळतो. या संगमाच्या कोपऱ्यातील जमिनीस पूर्वीपासून साधुवाण्याचा मळा असे संबोधले जाते. या मळ्यात ‘खट’ व ‘वांग’ नावाचे दोन ऋषींचे वास्तव्य होते. ते या पिंपळेश्वर मंदिरामध्ये येऊन महादेवाची पूजा तसेच तपश्चर्या करत असत. काही दिवसानंतर हे ऋषी काशी यात्रेला जावयास निघाले. जाताना पिंपळेश्वराचे दर्शन घेऊन हाताची ओंजळ करुन उभे राहिले असताना दोन पिंपळाची पाने ओंजळीत पडली. त्यांनी ती ‘श्रींचा प्रसाद म्हणून पोथीमध्ये जपून ठेवली. काशी यात्रेहून आल्यानंतर यात्रेची सांगता करण्यासाठी त्यांनी पोथी उघडली, त्यावेळी त्यांना प्रत्येक पिंपळपान सुवर्णमय झालेले दिसले. याच ऋषींच्या नावावरुन ‘खटांग’ हे नाव प्रथम पडले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन ‘खटाव’ असे संबोधण्यात येऊ लागले. खटावमध्ये जुनी हेमाडपंथी पध्दतीने व दगडाच्या आखीव रेखीव चिरांनी बांधलेली विठ्ठल-रुखुमाई मंदिर, पिंपळेश्वर मंदिर आहे. नदीपात्रात विष्णुपद हा विष्णूच्या पायाची चिन्हे असलेला काळा पाषाण आहे. या परिसरात नागनाथ, गणेश, सोमनाथ आदी हेमाडपंथी प्राचीन मंदिरे आहेत. खटावच्या भुईकोटला शिवरायांची भेट खटाव गावाला ऐतिहासिक महत्त्वही आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात कृष्णराव खटावकर (इनामदार) यांनी औरंगजेबाची व नंतर त्यांचा नातू कृष्णराव खटाकर (दुसरा) याने शाहू महाराजांची सेवा केली. तसेच अफजलखान विजापूरहून प्रतापगडकडे जात असताना त्यांचा तळ खटाव येथील निमजगा (नमाजगाह) या ठिकाणी पडला होता. मुसलमानी अमलात या गावाजवळ बांधलेला शहेनशहावली दर्गा या भागात प्रसिध्द आहे. येथील भुईकोट किल्ल्याला १६७३ मध्ये शिवाजी महारांनी भेट दिली असल्याचा उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजात उपलब्ध आहे. पूर्वीच्या हुसेनपूरचे शिवारात रूपांतर आजही पिंपळेश्वर मंदिराच्या समोर पिंपळाची झाड दिमाखात उभी आहेत. प्राचीन मंदिरांचा (१२ वे शतक) वारसा मिळालेले व एकेकाळी धन-धान्य व ज्ञानसंपन्न असे गाव बारा बलुतेदारांची वस्ती असलेलं व मोठी बाजारपेठ असलेले गाव. पूर्वीच्या काळी वस्ती असलेले व नंतर निर्मनुष्य झालेले ‘हुसेनपूर’ हे गाव आता खटावचे शिवार झाले आहे. अजूनही हे गाव महसुली गाव मानले जाते. वस्ती असताना किंवा शिवारात एक ग्रामदैवत असावे म्हणून दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर बांधलेले असावे.
‘खट’ अन् ‘वांग’ ऋषींच्या तपश्चर्येचे ठिकाण ‘खटाव’
By admin | Published: March 22, 2015 10:56 PM