खटाव : दुष्काळाचा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी भुरकवडी ग्रामस्थांनी निर्धार केला. दुष्काळाला हरविण्यासाठी ग्रामस्थ एकवटले असून श्रमदानाला सुरूवात करण्यात आली. सलग ४५ दिवस चालणाºया या स्पर्धेत आत्मविश्वास व श्रमाच्या बळावर निश्चितच यश मिळवणार असा निर्धार ग्रामस्थानी व्यक्त केला.
सगळा गाव सोमवारी रात्री बारा वाजता जागा झाला आणि हातात मशाल घेऊन तुळजाभवानी तसेच निनाई देवीचा आशिर्वाद घेऊन गावातून मशाल फेरी काढून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. टॅक्टर, ट्रॉली, दुचाकी तर काहीजण चालत रॅलीत सहभागी झाले. ओसाड असणाºया माळरानावर सर्वांना एकत्र बसून ४५ दिवसांत करावयाच्या कामाचे नियोजन सांगितले.
मध्यरात्री मशालीच्या उजेडामध्ये माळराणावर कुदळ, फावडे तसेच गाण्याच्या तालावर काळ्या मातीची सेवा करण्याचे काम सुरु झाले. यामध्ये सहभागी सर्व गावकरी, महिला, युवक युवती अगदी एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे कामाला लागले होते. वयोवृध्द लोकही दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी तरुणाईच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाले.