शेखर जाधव
वडूज : उत्तर कऱ्हाड, कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघात विखुरलेल्या खटाव तालुकावासीयांना कोणीच वाली नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. तहसीलदार स्थिरस्थावर होण्यापूर्वीच ते घरगुती कारणासाठी दोन महिने रजेवर गेले. तालुक्याचा कारभार प्रभारी म्हणून कोरेगावचे तहसीलदार अमोल कदम यांच्याकडे दिला. लांबचा पल्ला असल्यामुळे ते खटावला तुरळक येतात. खटाव तालुक्याच्या सोयी-सुविधांसाठी प्रभारी प्रांत म्हणून नुकतीच नूतन नेमणूक झाली आहे. मात्र, ते खटाव तालुक्यात विसावणे गरजेचे असताना त्यांचा ठिय्या माण तालुक्यातच विसावला आहे.
खटाव तालुक्यातील महसूल विभागात महसूल, निवासी, संजय गांधी निराधार योजना अशी तीन नायब तहसीलदार, तर पाच लिपिक, अवल कारकून, वाहनचालक, पाच शिपाई, दोन मंडलाधिकारी, अकरा तलाठी तसेच पहारेकरी एवढी पदे रिक्त असल्यामुळे अगोदरच तालुक्यातील महसूलचा गाडा हाकताना उपस्थित महसूल कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहे. त्यातच विविध कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दहा वर्षांत वडूज तहसील कार्यालयाचा बॅनर अतिरिक्त कारभारामुळे चांगलाच रंगला आहे. तालुक्यातील पाणी टंचाई, विविध प्रकारचे दाखले, जमीन महसूल विषयक कामे आणि धार्मिक व घरगुती कार्यक्रमाच्या परवानगी आदींसह विविध कामासाठी पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत आहेत.
पूर्णवेळ खटाव प्रांत म्हणून नेमणूक असलेल्या प्रांताधिकाऱ्यांनी खटाव तालुक्यातील जनतेचा अंत न पाहता याठिकाणी स्थायिक व्हावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. खटाव तहसीलच्या कामाचा व्याप आणि तीन विधानसभा मतदारसंघात विखुरलेल्या जनतेची पिळवणूक थांबविण्यासाठी महसूल विभागाने तातडीने कायमस्वरूपी हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
तालुक्यातील जनतेच्या कामाची व्याप्ती पाहता आणि त्यांची हेळसांड रोखण्यासाठी रिक्त पदासह तालुक्याला प्रांत आणि तहसीलदार यांची कायमस्वरूपी नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.
चौकट
खटाव तालुका आणि येथील सोशित जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने महसूल विभागातील रिक्त पदे भरावीत. तसेच प्रांताधिकारी म्हणून स्वतंत्र नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांनी वडूज तहसील कार्यालयात स्थानापन्न व्हावे, अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल. याला महसूल विभाग जबाबदार राहील, असा इशारा नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला.
चौकट
रजेचे नेमके कारण काय?
पाच महिन्यांपूर्वी हजर झालेले तहसीलदार किरण जमदाडे यांची पाच महिन्यांतील अल्पशी कारकीर्द या-ना त्या कारणाने वादग्रस्तच ठरत असताना, त्यांनी कागदोपत्री घरगुती कारणासाठी घेतलेली दोन महिन्यांची रजा याविषयी सध्या तालुक्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.