खटाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाले. यात प्राथमिक शाळा पूर्णतः बंद झाल्या. शाळेत मुले नसली तरी खटावमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळा परिसर स्वच्छ ठेवणे, तसेच इतर शैक्षणिक कामात मग्न आहेत.
ऑनलाइन काम तसेच ऑनलाइन शिक्षणाबरोबरच खटावमधील जिल्हा परिषद मुले व मुलीच्या शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिका कीर्ती माने, दत्तात्रय गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी शिंदे, आशा खरात, शशिकांत वाईकर, अनिता चिंचकर, अश्विनी वेदपाठक, कविता राऊत, सुजाता फडतरे, यास्मिन काझी हे मोकळ्या वेळेत शाळेच्या परिसरात खड्डे खोदून तेथे विविध फळझाडे, तसेच उपयुक्त असलेली झाडे लावण्यात मग्न आहेत.
परसबाग तयार करून त्यात विविध भाज्या, तसेच वेलवर्गीय भाज्यांचे टोकन पद्धतीने बी लावत आहेत. शाळेचा परिसर स्वच्छ करून तो सुंदर कसा राहील याकडे लक्ष देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत या बाबीकडे लक्ष देत असताना वृक्षारोपणासारखे काम करण्यात वेळ सत्कारणी लावण्यात मग्न असलेल्या शिक्षकांचे कौतुक होत आहे. मुले तसेच पालकही या कामात हातभार लावताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर मधल्या काळात पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला कलही जिल्हा परिषद शाळेची चिंता वाढत असताना, मात्र सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे पालकांचा वाढता संपर्क तसेच तेथील शिक्षकाचे ऑनलाइन पद्धतीने मुले व पालक यांच्याशी येत असलेल्या संपर्कामुळे सध्या तरी शैक्षणिक कामे सुरू आहेत.
कॅप्शन : खटाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी वृक्षारोपण केले. (छाया : नम्रता भोसले)