सणबूर : ‘माणुसकीला कलंक लावणाऱ्या काही प्रथा आजही महाराष्ट्रात सुरू आहेत. अंधश्रद्धेपोटी अनेक महिलांनी जटा ठेवल्याचे आजही ग्रामीण भागात दिसून येते. जटांचा आरोग्यावर आणि सामाजिक अस्तित्वावर गंभीर दुष्परिणाम होताना दिसतो. केसाला तेल, पाणी, वेणी नसते. त्यामुळे केस एकमेकात गुंततात. अस्वच्छ केसांचा गुंता म्हणजे जटा होय. समाजातील प्रत्येक घटकाने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये सहभागी झाले पाहिजे. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे,’ असे प्रतिपादन रयत विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. सुधीर कुंभार यांनी व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील काळोली येथील नववीमध्ये शिकत असलेल्या पायल तुकाराम शेरकर या विद्यार्थिनीला जटामुक्त करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आधार संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते, नाम फाउंडेशनचे सुहास पाटील, सुनील क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, ‘२१ व्या शतकाची आव्हाने पेलताना समाज विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. समाजात अनेकजण बुवाभाजी, जादूटोणा, नरबळी अशा अनेक अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. यातून अनेक कुटुंबाची वाताहत होत असते. अंधश्रद्धेमुळे लोकांच्या असह्यतेचा फायदा उठवला जात आहे. जटा असलेल्या स्त्रीचा सामाजिक, मानसिक, भावनिक, शारीरिक कोंडमारा होत असतो. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पायलसारख्या विद्यार्थिनीला तिचे नैसर्गिक स्त्री जीवन जगण्यास मिळावे, यासाठी तिला जटामुक्त करून शिक्षण व सामाजिक प्रवाहात आणल्याचा आनंद आहे.’
विश्रम दरडे, दादासाहेब जाधव, संगीता मोहिते, अक्षया पाटील, वैशाली खैरमोडे, ज्योत्स्ना सोनावणे, वहिदा मेवेकरी, अनिकेत पाटील, योगेश चौधरी, प्रसाद वळसंग, सोमनाथ जंगम, कन्हैय्या घोणे, पांडुरंग खैरमोडे, सुशांत गुरव, दीपक काळे, लक्ष्मण पाटील, शिवाजी लुगडे, नंदकुमार शेडगे, सुरेश चव्हाण, सुनील कवर उपस्थित होते. सोमनाथ आग्रे यांनी स्वागत केले. शेखर धामनकर यांनी आभार मानले.हरखलेली पायल शाळेत जाण्यास उत्सुकजटा असल्याने पायल मानसिक दडपणाखाली होती. परंतु आधार संस्थेने पायलच्या पालकांचे जटा आणि अंधश्रद्धा याबद्दलचे सर्व गैरसमज दूर करून पालकांचा होकार मिळवला. जटामुक्त झाल्याने पायलच्या चेहºयावर आनंद ओसंडून वाहत होता. गेले अनेक दिवस ती शाळेत गेली नव्हती. शाळेत जाण्यासाठी पायल आतूर झाली आहे.