म्हसवड : जिल्हा बँक निवडणूक मतदान अधिकाराचा ठराव नावावर झालेले पानवण (ता. माण) येथील डाॅक्टर नानासाहेब शिंदे (वय ५०) यांचे शनिवारी (सि. २७) रात्री साठेआठ वाजता अज्ञातांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कारची जाळपोळ केल्याचेही समोर आले आहे. हा प्रकार जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावावरून झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीतून डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या नावाचा ठराव काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. बँकेची निवडणूक स्थगित झाली असली तरी माण तालुक्यात राजकीय घडामोडी मात्र सुरूच आहेत. दरम्यान, डॉ. शिंदे हे शनिवारी रात्री साठेआठच्या सुमारास डाळिंबाला पाणी देण्यासाठी कार घेऊन शेतात गेले. रात्री साडेनऊपर्यंत ते घरी आले नाहीत. याचवेळी त्यांच्या पत्नीला गावातील ओळखीच्या व्यक्तीने फोन करून डाॅक्टरांची गाडी शेतात रस्त्याच्या कडेला उभी असून, गाडीच्या पुढच्या सीटवर एक चप्पल आणि दुसरी मागच्या सीटवर पडली आहे. तसेच कारची मागची सीट ॲसिडने जाळली आहे असे सांगितले. या प्रकारानंतर शिंदे यांची पत्नी जयश्री या तत्काळ दिराला सोबत घेऊन दुसऱ्या कारने तेथे पोहोचल्या. तेथील परिस्थिती पाहून पतीचे अज्ञाताने अपहरण केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी म्हसवड पोलिसांना याची माहिती दिली. डाॅ. नानासाहेब शिंदे यांच्या पत्नी जयश्री शिंदे या पानवणच्या नवनिर्वाचित सरपंच आहेत. डाॅक्टरांचे अपहरण होऊन २४ तास उलटले आहेत. मात्र, त्यांचा अद्याप थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत.
हा प्रकार राजकीय हेव्यादाव्यांतून घडला असण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली. घटनास्थळी फाॅरेन्सिक पथक आणण्यात आले. गाडीतील बऱ्याच ठिकाणी या टीमला ठसे आढळून आले असून, या ठशांवरून अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे जाणार आहे.
चाैकट : जिल्ह्याबाहेर पथके रवाना
डाॅ. नानासाहेब शिंदे यांच्या शोधासाठी पाच पथके सातारा जिल्ह्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत. त्यांचा मोबाईल घटनास्थळीच बंद झाला आहे. त्यामुळे लोकेशनवरून त्यांचा शोध घेणे थोडे पोलिसांना अवघड जाणार आहे. हा प्रकार नेमका अपहरणाचा आहे की, अन्य कोणते कारण आहे, याचा उलगडा डाॅक्टर सापडल्यानंतरच होणार आहे.
फोटो
२८सातारा०१
माण तालुक्यातील पानवण येथून डॉ. नानासाहेब शिंदे यांचे अपहरण केल्यानंतर त्यांची कार अपहरणकर्त्यांनी पेटवून दिली. (छाया : सचिन मंगरुळे)
२८डॉ. नानासाहेब शिंदे