लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांच्या किडनीचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे किडनी आजाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने अनेकांना जेरीस आणले. मूळचे आजार असलेल्या रुग्णांना याचा सर्वात जास्त फटका असला आहे. त्यामुळे किडनी आजाराचे रुग्ण अधिकच कमकुवत झाले असल्याचे समोर येत आहे. अगोदरच या रुग्णांना स्टेराॅइड देण्यात येते. त्यातच कोरोनाच्या डोसमध्ये स्टेराॅइडच्या गोळ्यांचा जास्त वापर करण्यात आला. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनही किडनीच्या आजार असलेल्या रुग्णांना दिले गेले. परिणामी या रुग्णांना आता वारंवार डायलिसिस करावे लागत आहे. या रुग्णांची प्रतिकारशक्तीही हळूहळू कमी होऊ लागली आहे. पोटदुखीचाही त्रास जाणवू लागला आहे. अशा प्रकारचे रुग्ण आता जिल्हा शासकीय रुग्णालयात येऊ लागलेत.
किडनीचा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यास...
nनियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्या. स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळा. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा. फास्ट फूड टाळा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. रक्तदाब-डायबेटीस असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने लघवी-रक्त तपासा. कोरोनातून पूर्णपणे मुक्त झाले तरी वरील नियमाचे कोटेकार पालन केल्यास रुग्णांच्या जीवितास धोका नाही.
हे करा
nमधुमेहाच्या रुग्णांनी औषधे व पथ्य पाळून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे.
- रक्तदाब नियंत्रणात ठेवणे. दर तीन महिन्यांनी लघवीतील प्रथिनांचे प्रमाण तपासून घेणे. रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार कमी होत असेल तर किडनीच्या आजाराची शक्यता पडताळून पाहणे.
हे करू नका
nडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार वेदनाशमन औषधी घेणे हे किडनी फेल होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. जेवणामध्ये जास्त मिठाचे प्रमाण नकोच. धूम्रपान, तंबाखू, दारू अशा प्रकारची व्यसने करू नये. अंगदुखीच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. तरच किडनी सुरक्षित राहील.
फॅमिली डाॅक्टरांशी बोलूनच घ्या स्टेराॅईड
n कोरोनाबाधित रुग्णांनी अगोदरच स्टेराॅईड घेतलेले असते. त्यामुळे आणखी औषधे घ्यायची झाल्यास फॅमिली डाॅक्टरांशी सल्ला घेऊनच औषधे घेणे गरजेचे आहे.
n दिवसातून कमीत कमी आठ लिटर पाणी, आणि विश्रांती गरजेची आहे.
n सकाळी रोज हलकासा व्यायाम, चालणे, योगा असे व्यायामाचे प्रकार करावेत.
n या रुग्णाला इतर कुठलाही आजार झाल्यास स्टेराॅईड घेऊ नये.
किडनीच्या आजाराच्या रुग्णाला जर कोराना झाला तर त्या रुग्णाची जास्त काळजी घ्यावी लागते. या रुग्णाला जेवणातून पाॅटॅशियम मिळू नये, याची खबरदारी घेतली जाते. या रुग्णांसाठी महत्त्वाचा डायट प्लॅन असतो. तो पाळणे गरजेचे आहे. क्रियेटिन वाढणे, पायाला सूज येणे ही लक्षणे दिसून आल्यास रुग्णालयात जावे.
- निखिल एकतपुरे- फिजिशीयन, जिल्हा शासकीय रुग्णालय