सातारा : शूरवीरांच्या स्मरणार्थ स्मारक रुपात उभारण्यात आलेल्या विरगळी आज इतिहासजमा झाल्या आहेत. असे असले तरी राज्यभरात आजही त्यांचे अस्तित्व दिसून येते. वाई तालुक्यातील किकली या गावातही नवव्या, दहाव्या शतकातील पन्नास ते साठ विगरळी आढळून आल्या आहेत. हा विरगळींचे संवर्धन करण्याबरोबरच त्यांचा इतिहास जगापर्यंत पोहोचविण्यासाठी किकली हे गाव महाराष्ट्रातील पहिलं ‘विरगळीचं गाव’ म्हणून लवकरच नावारुपास येणार आहे.
वीरगळ हे एक स्मारक असते. एखाद्या शूरवीराच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केलेले असते. शूरवीर पुरुष अथवा स्त्रीने कोणत्या कारणास्तव आपल्या प्राणाची आहुती दिली, याचे स्पष्टीकरण वीरगळीमध्ये पाहावयास मिळते.भारतासह राज्यातील अनेक गावांमध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरात अशा प्रकारच्या विरगळी आजही पाहावयास मिळतात. किकली या गावातही अशा प्रकारच्या पन्नास ते साठ विरगळी आढळून आल्या आहेत.
आपल्या गावाला लाभलेल्या या प्राचीन शिलालेखांचे महत्त्व ओळखून गावातील युवापिढी संवर्धनासाठी पुढे सरसावली आहे. सर्व विरगळी एकत्र करून, त्यांचे जतन करण्यात येणार आहे. गड, किल्ले सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली या विरगळींचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी किकली महाराष्ट्रातील पहिलं ‘विगरळीचं गाव’ म्हणून नावारुपास आणण्याचा निर्धार केला आहे.