-प्रगती जाधव-पाटीललोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांची कॉलर उडविण्याची स्टाईल चर्चेची ठरली. कºहाडच्या सभेत तर चक्क शरद पवारांनीच कॉलर उडवून स्टाईलला पोचपावती दिली. सोशल मीडियाने ही कॉलर देशभरात पोहोचविली. राजेंनी स्टाईलने कॉलर उडवून मैदान मारलं; पण लोकांच्या मनातील प्रश्न अनुत्तरीतच राहिलं..!
गत लोकसभा निवडणुकीतील तब्बल साडेतीन लाखांचं लीड यंदा का बरं कमी झालं, वाढलेले दोन लाख नवमतदार गेले कुठे? मतदारांनी का फारकत घेतली? याचा शोध राजे तुम्ही घ्या; तो भोवतालच्या माणसांकडून न घेता थेट मतदारांकडून घ्या. मताधिक्य घटण्यामागची कारणं उमगतील, तुम्ही त्यावर अंमल कराल त्यावेळी राजे तुम्ही कॉलर उडवाच..!
‘पेन्शनर सिटी’चं साताऱ्याला चिकटलेलं बिरुद हे भूषण नव्हे, तुम्हीपण जाणता. पैलतिराकडे झुकलेल्या पालकांना घरात सोडून शिक्षण-नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणारे तरुणाईचे लोंढे पुन्हा वळायचं म्हणतात. १४-१४ वर्षे टोल भरत सोमवार-शुक्रवार अप-डाऊन करणारी ही पिढी बेजार झालीये. त्यांच्या पात्रतेच्या नोकºया इथं नाहीत. आपल्या साताºयात दर्जेदार उच्च शिक्षण, रोजगारासाठी पूरक वातावरण तुम्ही इथं करा आणि मग, ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’
उरमोडी धरणाचे पाणी शिवारापर्यंत पोहोचेल याकडे दुष्काळी भागातील जनता आस लावून आहे. दोन पंचवार्षिक संपल्या आपण हा विषय जाहीरनाम्यातून बाहेर कधी आणलाच नाही. दुष्काळी जनतेला हक्काचे पाणी मिळाले, चारा छावण्यांची गरजच संपली तर, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’
जागतिक वारसा स्थळाचं कोंदण असलेलं कास आता भकास होऊ लागलंय. तिथं वाढलेले सिमेंटचे जंगल आपल्याही नजरेतून सुटलेले नाही. लोकांनी रोजगार करावा आणि मोठं व्हावं; पण हे होत असताना त्यांनी निसर्गाशी केलेला खेळ आपण आपल्या ‘दबंग’ स्टाईलने दुरुस्त करावा आणि मग ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’
अवघ्या जिल्ह्यातील तरुणाई तुमची दिवाणी आहे. तुमचा डायलॉग त्यांच्यासाठी ईश्वरवाणी आहे. एका सेल्फीसाठी ती तुमच्यावर मरती आहे. तरुणांचे बड्डे केक कापण्याबरोबरच करिअरविषयी त्यांना जागरूक करा. त्यांच्या मनातील ‘धुमश्चक्रीची भीती’ घालवून साताºयातील वातावरण निवळू द्या. तुमच्या मार्गदर्शनाने त्या मातीच्या गोळ्यांना आकार मिळाला तर ‘राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’इथल्या आया-बायांसाठी तुम्ही बंधुतूल्य अन् लेकरा समान भासता; पण आपली भेट घ्यायची म्हटलं की ‘महाराजांचा मूड नाय..’ हे शब्द ऐकले की अस्वस्थ होतं. कामासाठी हेलपाटे पडतात तेव्हा मन उदास होतं. तुम्ही साताºयात खरंच २४ बाय ७ उपलब्ध असाल आणि लोकांची गाºहाणी ऐकाल तेव्हा, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’
सावलीला पण आपली शंका येऊ नये इतकं सजग सार्वजनिक जीवनात कसं वागावं याचं तंत्र तीन दशकांत अवगत केलं. आपलं खासगी आयुष्य सार्वजनिक झाल्याने प्रतिमेला धक्का बसत आहे. काय म्हणताहेत तुमचे खासदार!’ असे बाहेरच्यांचे कुत्सित प्रश्न सातारकरांना सतावताहेत. यंदा ‘हॅट्ट्रिक’च्या निमित्ताने खासगी बाबी सार्वजनिक होणार नाहीत अशी ‘कमिटमेंट’ द्या आणि मगच, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!’
रात्री-अपरात्री शहरातून फेरफटका मारून रयतेची ख्यालीखुशाली पुसणारे आपण जाणते राजे आहात. पण, याच रयतेला दिवसा दोन वेळच्या अन्नपाण्यासाठी काय-काय सोसावं लागतं हे जाणून घ्या. सहज, सुंदर जीवन जगण्याच्या त्यांच्या हक्कात माती कालवणारे बाजारबुणगे, विकासाच्या त्यांच्या मार्गातील असले दगड-धोंडे बाजूला सरतील असं बघा आणि मग, ‘होय राजे तुम्ही कॉलर उडवाच..!