औंध : श्री यमाई देवीच्या पायथ्याशी मंगळवारी सायंकाळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे येथील किरण भगतने सातव्या मिनिटांला उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखवून औंधचे मैदान मारले. त्याला दोन लाखांचा इनाम देऊन गौरविण्यात आले.येथील श्री यमाई देवीच्या वार्षिक यात्रेनिमित्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या वतीने या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षणीय लढतीत किरणने विजय मिळविताच प्रेक्षकांनी जल्लोष केला. त्याला गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते, आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, राजकन्या चारुशीला राजे, हर्षिताराजे, जितेंद्र पवार, पिंटू पैलवान, नंदकुमार मोरे, हिंदुराव गोडसे, हणमंतराव शिंदे, रमेश जगदाळे, सदाशिव पवार, वसंत जानकर, राजेंद्र माने, जयवंत भोसले, प्रशांत खैरमोडे, चंद्रकांत कुंभार, अब्बास आतार यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी प्रथम क्रमांकाच्या कुस्तीला सुरुवात झाली. नंदू वजनाने भारी तर किरण उंचीने कमी होता. चौदंडी झडताच दोघांनी मनगटातील ताकद अजमावली. नंदू अनुभवाच्या जोरावर आक्रमक होण्याच्या प्रयत्नात असतानाच किरणने त्याचा एकेरी पट काढून ताबा घेतला. एकचाक डावाची पकड करून त्याला चितपट करण्याचा प्रयत्न करीत असताना नंदूने डंकी मारत डाव उलटविण्याचा प्रयत्न केला; मात्र किरणने त्याचा डाव धुडकावून लावीत पकड ढिली होऊ दिली नाही. पुन्हा एकदा नंदूचा डंकीचा प्रयत्न असताना किरणने पोकळ घिस्सा डावावर चितपट केले.एक लाख इनामासाठी कोल्हापूरच्या विजय पाटीलला पुण्याच्या शैलेश शेळकेने चांगलेच झुंजवले. दोघेही समान ताकदीचे मल्ल परस्परावर ताबा घेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र संयमी शैलेशने विजयाची मोनी बांधून त्याला धूळ चारून बाजी मारली.प्रशांत शिंदे सांगली आणि संतोष पडळकर ही ७५ हजार इनामाची कुस्ती रंगतदार झाली. डाव प्रतिडावावर दोघेही मल्ल विजयासाठी निकराची झुंज देत होते. मात्र अखेरीस पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. ५० हजारांच्या इनामासाठी पुण्याच्या संदीप काळेने पारगावच्या रामदास पवारला सलामीलाच घिस्सा डावावर अस्मान दाखवले.या प्रमुख लढतीशिवाय मैदानात किसन तनपुरे, सनी इंगळे (औंध), उदय पवार, शरद डोंबरे (पारगाव), महादेव माने (सांगली), संग्राम सूर्यवंशी (लांडेवाडी), अनिकेत चव्हाण (आर्वी), मनोज कदम (नांदोशी), सागर देशमुख (जायगाव), मनोज जाधव (खबालवाडी), अभिजित भोसले (रहिमतपूर), भगवान एडके (कुंडल), धनंजय गोरड (पुणे) यांनी प्रतिस्पर्धी मल्लांवर प्रेक्षणीय विजय मिळवून उपस्थितांची वाहवा मिळविली.या मैदानात पंच म्हणून विकास जाधव, सदाशिव पवार, वसंत माने, किसन आमले, आकाराम आमले, नारायण इंगळे, के. टी. कांबळे, विकास पाटील, नितीन शिंदे, वसंत जानकर, अधिक जाधव, सदाशिव इंगळे, मच्छिंद्र कुंभार यांनी काम पाहिले.मैदानात ज्येष्ठ नेते डी. पी. कदम, गणेश शिंदे, महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, बाळू पडघम, शिवाजी सर्वगोड, नवल थोरात, चंद्रकांत पाटील, धनाजी पावशे, सुनील घोरपडे, गोरख पवार, शंकर खैरमोडे, रवींद्र थोरात, बापूसाहेब कुंभार, सचिन शिंदे, दत्तात्रय जगदाळे, तात्या भोकरे, महादेव जाधव, जालिंदर शेठ राऊत, पल्लू पोचखानवाला, रोशन खंबाटा, शैलेश मिठारी, गणेश सुतार, सागर यादव, रामभाऊ भोकरे, सोमनाथ यादव, इम्तियाज पटवेकरी, प्रा. संजय निकम, प्रमोद राऊत, दीपक कदम, उमेश थोरात, जगन्नाथ यादव, चंद्रकांत जाधव, प्रदीप कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट म्हणजे ५० हजारांच्या वर कुस्ती शौकिनांची उपस्थिती. कुस्ती समालोचक ईश्वरा पाटील व हलगीवादक सदाशिव आवळे (कुरुंदवाड) यांनी कुस्ती आखाड्यात ऊर्जा निर्माण केली.कुस्तीप्रेमींच्या वाढत्या गर्दीमुळे जागा न मिळणाऱ्यांनी झाडावर, घरावर बसून कुस्त्यांचा आनंद घेतला.कुस्ती मैदानात प्रथमच राजकन्या हर्षिताराजे व चारुशीलाराजे यांची उपस्थिती.
किरण भगतने मारले औंधचे कुस्ती मैदान
By admin | Published: February 15, 2016 11:26 PM