- प्रगती जाधव पाटील
सातारा : वडगाव (जयराम स्वामी) येथील सुपुत्र विठ्ठलराव यशवंत घार्गे यांचे नातू आणि रविंद्र विठ्ठल घार्गे यांचे चिरंजीव किरण घार्गे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून वैधमापन निरीक्षक (राजपत्रित अधिकारी) पदासाठी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. वडिलांच्या किराणा मालाच्या दुकानात त्यांना मदत करताना हातात येईल तो कागद वाचण्याची सवय स्पर्धा परीक्षांच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण पायरी ठरली असे किरण सांगतात.
प्रश्न : वडगाव ते दिल्ली हा प्रवास कसा होता? उत्तर : वडगाव शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी साताऱ्यात आलो. बारावीनंतर कऱ्हाडच्या शासकीय महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी संपादन केली. शालेय जीवनापासूनच अभ्यासाची आवड आणि गती असल्यामुळे पदवी संपादन केल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळलो. यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीत असलेल्या क्लासेस मध्ये दीड वर्ष शिकण्याचे उद्दिष्ट ठेवून तिथे गेलो यात यश मिळाले पण निवड होऊ शकली नाही.
प्रश्न : स्पर्धा परीक्षांची तयारी पदवीनंतर करावी असे का वाटले? उत्तर : पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण उत्कृष्ट पद्धतीने समजून घेऊन होणे अपेक्षित आहे कोणत्याही पदावर जाण्यासाठी पदवी असणे आवश्यक आहे ही पदवी नाममात्र मिळवण्यापेक्षा उत्तम गुणांनी संपादन केली तर त्यातून मिळालेले ज्ञान सेवा कालावधीत उपयोगाला पडते. या कालावधीत सलग अभ्यास करण्याची सवय ही मुलांना लागते. त्यामुळे दहावीपासूनच मुलांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लावू नये. त्यांना जी पदवी मिळवायची आहे ती उत्तम गुणांनी मिळविल्यानंतर पुढच्या तीन वर्षात ते स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करू शकतात.
प्रश्न : स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात विचलित करणारे घटक कोणते?उत्तर : यशस्वी व्हायच्या तयारीनेच जर स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचे ठरवलं तर अपयश येण्याची शक्यता कमी राहते. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपल्या भोवताली असणाऱ्या मित्र परिवाराची भूमिका मोलाची असते. या परीक्षा देण्याचा विचार केल्यानंतर सोशल मीडियापासून स्वतःला दूर करण्याची परीक्षा युवांना द्यावी लागते. परीक्षेसाठी आवश्यक तेवढे ॲप ठेवून चॅटींगचे सर्व ॲप डिलीट करणे ही परीक्षेच्या तयारीची पहिली पायरी म्हणावी लागेल. दैनंदिन घडामोडी समजून घेण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन महत्त्वपूर्ण ठरते.
तयारीचा कालावधी निश्चित असावासरकारी नोकरीतील करिअर युवांना सर्वाधिक आकर्षित करत असते. पदवी संपादन केल्यानंतर पुढे कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन वर्ष शासकीय नोकरीच्या तयारीसाठी युवांनी ठेवावेत. त्यापेक्षा अधिकचा वेळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी घालवला तर करिअरला कमी अधिक प्रमाणात फटका बसण्याची शक्यता असते.
इंग्रजीचे ज्ञान आवश्यकस्पर्धा परीक्षेची तयारी करताना यूपीएससी आणि एमपीएससी अशा दोन्ही आघाड्यांवर प्रयत्न सुरू होते. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे यूपीएससीची परीक्षा देताना इंग्रजी वरील प्रभुत्व असावे हे प्रकर्षाने जाणवले. यूपीएससीचे दोन अटेम्प्ट यशस्वी झाले तरीही निवड न झाल्याने पुन्हा एकदा एमपीएससीच्या मार्गाने स्पर्धा परीक्षेत यश मिळविले. या परीक्षा दरम्यान इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले.
अभ्यासाप्रती निष्ठा, समाज माध्यमापासून विरक्ती आणि कुटुंबीयांचा ठाम पाठिंबा ही स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याची त्रिसूत्री आहे. बुद्धिमान असण्याबरोबरच चाणाक्ष विचार करण्याची क्षमता हे या स्पर्धा परीक्षांचा गाभा आहे. कष्टाची तयारी असेल तर ही स्पर्धा तुम्हाला निश्चित यश मिळवून देते.- किरण घार्गे, वैधमापन निरीक्षक, राजपत्रित अधिकारी