कोरेगाव : कोरेगाव, खटावसह जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जरंडेश्वर साखर कारखान्याने न्याय दिला आहे, मात्र भाजप नेते किरीट सोमय्या हे जाणूनबुजून कारखान्याच्या विषयात राजकारण करीत आहेत. त्यांच्या ३० सप्टेंबरच्या संभाव्य कारखाना भेटीच्या निषेधार्थ कोरेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
जरंडेश्वर कारखान्याने कधीही राजकारण केले नाही. थेट शेतकऱ्यांशी संपर्क असलेल्या या कारखान्याने शेतकरी हित जोपासले आहे. एफआरपीपेक्षा जास्त दरदेखील याच कारखान्याने दिला होता. मात्र, चांगला चाललेला कारखाना हा राजकारणातून बंद पडतो की काय, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना, भाजपचे नेते किरीट सोमय्या हे कारखान्यावर येण्याची भाषा राजकारणातून करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ऊस उत्पादक शेतकरी नवनाथ गायकवाड, जितेंद्र जगदाळे, रवींद्र चव्हाण, अनिल चव्हाण, अरिफ मुलाणी, कैलास साळुंखे, अक्षय बा. साळुंखे, अक्षय ता. साळुंखे, राजेंद्र जाधव व नारायण यादव यांच्यासह शेतकऱ्यांनी कारखाना वाचावा, यासाठी आघाडी उघडली असून, त्यांनी गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार लोखंडे यांना निवेदन सादर करून सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
चौकट
सोमय्यांना त्यांची जागा दाखवून देऊ
जरंडेश्वर कारखान्यावर राजकारणाला थारा नाही. कोणताही गाजावाजा न करता, उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जातात. योग्य दर, अचूक वजनकाटा, वेळेत उसाची नियोजनबद्ध तोडणी, ऊस विकास योजना, कार्यक्षम तोडणी यंत्रणा यांसह सीएसआरमधून तालुक्यातील गावांमध्ये विकासकामे केली जात असताना, किरीट सोमय्या केवळ राजकारणासाठी कारखान्यावर येऊन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांची आणि कामगारांची अर्थवाहिनी असलेला कारखाना बंद पाडून, राजकारण करू पाहणाऱ्या किरीट सोमय्या यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देऊ, असा इशारा या शेतकऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.