सातारा : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवस्थापनाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ अन्वये संचालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून, कारखान्याच्या सर्व संचालकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारखान्यासाठी नेमलेल्या विशेष लेखा परीक्षकांनी कारखान्याच्या एकूण कारभारावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
किसन वीर साखर कारखान्याचा तोटा १७४०३.६६ लाख रुपये इतका झालेला आहे. कारखान्याने शिल्लक साखरेचे मूल्यांकन, उपपदार्थ शिल्लक साठा मूल्यांकन गतवर्षी वास्तव दराने केले नाही. ऊस पुरवठा, साखर उत्पादन व विक्री विषय खर्चात वाढ नेमकी कारणे काय? याबाबत अंदाजपत्रकीय खर्च व प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये नेमका किती फरक आहे? या तफावतीबाबत तपशीलवार कारणमीमांसेसह वार्षिक सभेची मंजुरी घेतली होती का? याचा खुलासा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे प्राधिकृत चौकशी अधिकारी तथा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ डी. एन. पवार यांनी कारखान्याला मागितला आहे.
प्रतापगडचे दायित्व पूर्ण केले नाही....
जावळी तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर किसन वीर साखर कारखान्याने चालवायला घेतला. शासनाने १६ वर्षांसाठी हा कारखाना चालवायला दिला होता. किसन वीर कारखान्याने स्वीकारलेले दायित्व पूर्ण केले नाही. ५१४०.४९ लाखांपैकी ४५९९.५७ लाख व बँक कर्ज व्याज ३२९.४२ लाख भरण केले ५४०.९२ लाख दायित्व अद्याप दिलेले नाही. स्वीकारलेले दायित्व करार झाल्यापासून १८ महिन्यांच्या आत अदा करणे आवश्यक असताना ५४०.९२ लाख देणे प्रलंबित आहेत.
कारखान्याचे नक्त मूल्य उणे
किसन वीर, खंडाळा व प्रतापगड या तिन्ही कारखान्यांचे नक्त मूल्य उणे दिसत आहे. किसन वीरचे नक्त मूल्य उणे ५० कोटी ५५ लाख ८५ हजार, किसन वीर/प्रतापगड भागीदारी युनिटचे नक्त मूल्य उणे ५४ कोटी ९४ लाख ७५ हजार, तर किसन वीर खंडाळा युनिनटचे नक्त मूल्य उणे १३ कोटी ८२ लाख ३१ हजार इतके झाले आहे. तिन्ही कारखान्यांच्या अयोग्य नियोजनामुळे हा प्रकार झाल्याचे तपासणी अहवालात म्हटले आहे.
खोटे विवरण केल्याचे उघड
कारखान्याच्या अधिकाऱ्याने किंवा समितीने किंवा सदस्याने जाणूनबजून खोटे विवरण तयार करणे तसेच खोटी माहिती पुरविणे, योग्य हिशेब ठेवण्यात कसूर करणे व बुद्धीपुरस्सर खाेटी विवरण तयार करणे, आदी चुकीच्या बाबी केल्याचे उघडकीस आले आहे.
संचित तोटा वाढला
किसन वीर कारखान्याचा सन २०१९/२० अखेरचा संचित तोटा ११३ कोटी ३० लाख ३४ हजार इतका आहे. किसन वीर, प्रतापगड भागीदारी युनिटचा तोटा याच सालातील तोटा ६० कोटी ७३ लाख ३७ हजार आहे. त्याप्रमाणे १७४ कोटी, तीन लाख, ६६ हजार एकत्रित संचित तोटा आहे. कारखान्यांमध्ये अनावश्यक गुंतवणूक, पूर्ण क्षमतेने प्रकल्प न चालविल्यामुळे हा तोटा वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
अनेक व्यवहार आक्षेपार्ह
किसन वीर कारखान्याचे दत्त इंडिया प्रा. लि. या कंपनीशी केलेले खरेदी-विक्री व्यवहार आक्षेपार्ह आहेत. कारखान्याला इथेनॉल विक्री व्यवहारातून २३ कोटी ३ लाख ९५ हजार उत्पन्न मिळायला हवे होते. मात्र, कारखान्याने दत्त इंडिया कंपनीशी केलेल्या विक्री, पुनर्खरेदी व्यवहारांमुळे १० कोटी ३६ लाख १२ हजार इतका तोटा भरून निघालेला नाही. ऑईल कंपन्यांना करारानुसार इथेनॉल पुरवठा झाला नसल्याने १ कोटी ३५ लाख ५५ हजार इतका दंड किसन वीर कारखान्याला भरावा लागला.