पाचवड : शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोहोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी किसन वीर साखर कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर न्यायालयात ४५ फौजदारी खटले दाखल केले होते. यांतील शेवटच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागला. सर्वच्या सर्व ४५ खटल्यांचा निकाल किसन वीर कारखान्याच्या बाजूने लागला आहे. शेवटच्या खटल्याची सुनावणी मेढा न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. काळे यांच्यासमोर झाली.
याबाबतची पार्श्वभूमी अशी की, भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर विरोधकांनी ४५ खटले दाखल केले होते. वास्तविक कार्यक्षेत्रात पुरेशा उसाची उपलब्धता होण्यासाठी २००४ मध्ये ही योजना बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने राबविली होती. या प्रकरणामध्ये कवठे, ता. वाई येथील राहुल मधुकर डेरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी, अधिकारी यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून ८ हजार ७५० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार केगली होती. मेढा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन सदर खटल्यातून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २००४-०५ या वर्षात कारखान्यात कमी गळीत झाले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता व्हावी यासाठी बँकेच्या सहकार्याने कारखान्याच्या वतीने योजना राबविली. या योजनेचा लाभ २ हजार ७२५ शेतकऱ्यांनी घेत १६०८.९१ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ऊस लागवड झाली. विरोधकांनी संस्थेला वेठीस धरत ४५ जणांना पुढे करीत वाई न्यायालयात ३७, सातारा न्यायालयात २, मेढा न्यायालयात ६ खटले दाखल केले होते.
त्या सर्वच्या सर्व खटल्यांमधून मदन भोसले, गजानन बाबर व इतरांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या खटल्याचे कामकाज कारखान्याचे पदाधिकारी यांच्या वतीने अॅड. ताहिर मणेर, अॅड. दिनेश धुमाळ, अॅड. साहेबराव जाधव, अॅड. विद्या धुमाळ, अॅड. भारती कोरवार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने अॅड. सुरेश खामकर यांनी पाहिले.
चौकटी :
न्यायदेवतेने न्याय केला : भोसले
किसन वीर कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर चांगलेच काम करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनेबाबत खटले दाखल केले गेले. व्यक्तिगत माझ्यावर राग असेल तर मी समजू शकतो; त्यावर माझा बिलकुल आक्षेप नाही. मात्र आसूयेपोटी संस्था वेठीस धरताना काहीच कसे वाटत नाही? न्यायदेवतेने न्याय केला; नियतीही न्याय करील, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
छळायचे तेवढे छळा; न्याय होतोच : बाबर
व्यक्तिगत राग असेल तर समोर येऊन व्यक्त करा. स्वत:च्या जळफळाटापोटी संस्थेशी खेळ करू नका. वार्षिक सभेत कधी यायचं नाही, एक शब्द बोलायचा नाही. स्वतः ऊस घालायचा नाही, दुसऱ्याला घालू द्यायचा नाही. संस्थेचा बाजार उठवायला मात्र पुढे करायचे हे लोकांना समजत नसेल अशा भ्रमात कोणी असेल तर त्यांनी तसे राहू नये. आणखी किती छळायचं ते छळा; न्याय होतो, देवाच्या काठीला आवाज नसतो हे संबंधितांनी विसरू नये, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी व्यक्त केली.